विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे
वैजापूर
तालुक्यातील शिवराई येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता, त्यांना प्रत्यक्ष जीवनातील आर्थिक व्यवहारांसाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशान 'विद्यार्थी डिजिटल बचत बँके'ची स्थापना करण्यात आली. शाळेचे उपक्रमशील शिक्षक राहुल कळंके यांच्या दूरदृष्टीच्या 'सक्षमतेचा' या नवोपक्रमांतर्गत 'आर्थिक सक्षमता' या महत्त्वाच्या पैलूंना स्पर्श करणारी ही संकल्पना आता प्रत्यक्षात साकारली आहे.
या बँकेची रचना विद्यार्थ्यांना बँकिंग प्रणाली शिकणे व कृती करून पाहणे यांचा प्रत्यक्ष अनुभव देणारी आहे. बँकेच्या स्थापनेपासूनच त्यांना खाते उघडण्याचे फॉर्म वाटप करण्यापासून ते भरणा पावती व पैसे काढण्याची पावती कशी भरावी यावर कार्यशाळा आयोजित करण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रिया शिकवण्यात आल्या. यावेळी पासबुक वितरण कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक ई.बी. गवळी यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत यातून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचे धडे मिळतील असे मत व्यक्त केले. वर्गातील एका कोपऱ्यात बँकेसाठी सुसज्ज जागा निश्चित करण्यात आली असून, कॅश बुक कसे अद्ययावत ठेवावे यासारख्या सूक्ष्म बाबींचीही रचना केली आहे.
या बँकेचे सर्वात महत्त्वाचे आणि आधुनिक वैशिष्ट्य म्हणजे, ही बँक पूर्णपणे विद्यार्थ्यांकडूनच चालवली जाते आणि ती 'डिजिटल' स्वरूपाची आहे. दुकानदार उधारीची नोंद ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ॲप्लिकेशनचा वापर करून बँकेचे सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने होतात. यातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा बँकिंगमध्ये कसा उपयोग होतो हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळते. विशेष म्हणजे विद्यार्थ्याने बचत बँकेत पैसे जमा केले किंवा काढले तरी तात्काळ त्यासंबंधीचे मेसेज त्यांच्या मोबाईलवर जातात. इतकेच नाही तर, प्राप्त झालेल्या लिंकवरून विद्यार्थी स्वतःच्या खात्याचे 'अकाउंट स्टेटमेंट' देखील पाहू शकतात ज्यामुळे त्यांना बँकिंग व्यवहारांची पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव होते.
सध्या हा पथदर्शी प्रकल्प इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला आहे. इयत्ता पाचवीच्या बँकेची स्थापनेची जबाबदारी भाग्यश्री मुठे अत्यंत यशस्वीरित्या पार पाडत आहेत तर इयत्ता आठवीच्या बँकेची धुरा राहुल कळंके हे स्वतः सांभाळत आहेत. या प्रकल्पाला विद्यार्थ्यांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून पुढील काळात ही संकल्पना सर्व वर्गांसाठी लागू करण्याचा मानस कळंके यांनी यावेळी व्यक्त केला. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक ई.बी. गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील सर्व शिक्षकांनी सहभाग नोंदविले. यावेळी आर. झेड. परदेशी, आर.एस.पगारे, एस. के. तुंबारे, एस.एन. बलीकोंडवार, जी.बी.गायके, पी.ए.कळसकर, एस.टी.भुजाडे, बी.टी. वानखडे, वाय.डी.जेजुरकर, बी.ए.मुठे, बी. आर.पवार, आर. ए.कसबे यांनी मोलाचे सहकार्य करत बँकेच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण वाटा उचलला. तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर आदमाने, उपाध्यक्ष रवींद्र त्रिभुवन व सर्व समिती पदाधिकारी व पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या 'विद्यार्थी डिजिटल बचत बँके'मुळे विद्यार्थ्यांना केवळ बचतीची सवयच नाही तर आर्थिक नियोजनाचे आणि आधुनिक डिजिटल बँकिंगचे सखोल ज्ञान मिळून ते भविष्यात अधिक सक्षम व जबाबदार नागरिक बनतील असा दृढ विश्वास पालक व शिक्षकांत व्यक्त करण्यात येत आहे.


.jpg)
.jpg)
Social Plugin