वैजापूरात 'किस्सा कुर्सी का' : कट्ट्यावरच्या गप्पांना उधाण....


वैजापूर

पालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून शहरातील राजकीय घडामोडी बघता 'किस्सा कुर्सी का' या आशयाची चर्चा शहरातील कट्ट्या-कट्ट्यांवर  रंगू लागली आहे. विधानसभा निवडणुकीत आमदार रमेश बोरनारे यांनी  डॉ. दिनेश परदेशी यांच्याविरुद्ध निवडणूक जिंकली.  डॉ. परदेशी यांनी आमदार बोरनारेंविरुद्ध निवडणूक लढविल्याने आ.बोरनारे यांची अद्यापही डॉ. परदेशींवर नाराजी आहे. दरम्यान नगरपालिका निवडणुकीत डॉ. परदेशी यांना शह देऊन आ. बोरनारे यांना भविष्यात तालुक्यातील राजकीय पटलावर 'वन मॅन आर्मी' होण्याची नामी संधी समोर दिसत असल्याने या पालिका निवडणुकीत ते पूर्ण शक्ती पणाला लावणार असल्याचे वैजापूरकरांत चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर भाजप-सेना युती होणे सध्या तरी कठीण दिसत आहे. 


आगामी पालिका निवडणुकीत डॉ. दिनेश परदेशी यांना खिंडीत पकडण्यासाठी आमदार रमेश बोरनारे हे पूर्ण ताकद पणाला लावणार असल्याचे सध्या चित्र आहे. दरम्यान विशिष्ट समाज व समुदायात लोकप्रिय असलेले हाजी अकिल शेख यांच्याशी शहरातील पहिल्या फळीतील सर्व पक्षीय नेते संपर्कात आहेत. मात्र हाजी अकिल शेख यांनीही हातचा राखून ठेवत आपले पत्ते अद्यापही खुले केलेले नाहीत. मात्र उपनगराध्यक्ष पदासाठी जो पक्ष शाश्वत प्राधान्य देईल त्या पक्षासोबतच शेख हातमिळवणी करतील अशी राजकीय जाणकारांचे मत आहे. याशिवाय पडद्याआडच्या हालचाली बघता राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने देखील स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी चाचपणी सुरू असल्याचे हाजी अकिल शेख यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांचे व डॉ दिनेश परदेशी यांचे  ऋणानुबंध बघता स्वबळावर निवडणूक लढविण्यास अकिल शेख यांना स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत सहमती मिळणे सध्यातरी कठीण दिसते. याशिवाय आमदार बोरनारे यांच्या निकटवर्तीयांकडून देखील अकिल शेख यांना युतीसाठी गळ टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील
इतर पदाधिकारी यासाठी सकरात्मक होतील हे देखील सध्या अशक्यप्राय वाटते. आजघडीला राज्यात भाजप-सेना-राष्ट्रवादी महायुती असल्याने वरिष्ठ स्तराहून स्थानिक युतीसाठी आदेश आल्यास आमदार बोरनारे हे पक्षश्रेष्ठींचा आदेश शिरोधार्य मानतील हे देखील तितकेच खरे !


डॉ. दिनेश परदेशींसमोर निवडणूक रिंगणात उमेदवार कोण ?

वैजापूर नगरपालिकेचे अध्यक्षपद हे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षित झाल्याने भाजपचे नेते डॉ. दिनेश परदेशी यांना या निवडणुकीत स्थानिक पातळीवर पक्षाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीत डॉ. परदेशी यांना शह देण्यासाठी आमदार रमेश बोरनारे यांचे बंधु संजय बोरनारे हे देखील ऐनवेळी निवडणूक रिंगणात उतरू शकतात तरी देखील आमदार बोरनारे यांच्याकडून पालिका निवडणुकीत अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी इतरही 'पक्क्या भिडू'ची चाचपणी सुरू असल्याची वैजापूरकरांत जोरदार  चर्चा सुरू आहे.


उपनगराध्यक्षपदाच्या दावेदारीवर ठरणार निवडणूकाचा निकाल !!

वैजापूर पालिका अध्यक्षपद हे ओबीसीसाठी राखीव झाल्याने अध्यक्षपदाच्या इतर इच्छुकांना आपली राजकीय महत्वकांक्षा गुंडाळावी लागली. असे जरी असले तरी 'ते' इच्छुक उपनगराध्यक्षपदासाठी आपली पूर्ण ताकदपणाला लावून उपनगराध्यक्ष पदासाठी 'जो देईल शब्द त्याचे ठरवू आम्ही राजकीय प्रारब्ध' या भूमिकेत असल्याचे चित्र आहे. 

दशरथ बनकर यांचा पक्ष बदल चर्चेला पूर्णविराम...

भाजपचे जिल्हा सरचिटणीस दशरथ बनकर हे पालिका निवडणुकीपूर्वी ०६ नोव्हेंबर रोजी शिंदेंसेनेत प्रवेश करणार असल्याच्या शहरात वावड्या उठल्या होत्या. मात्र 'मी आहे त्या पक्षातच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहे' असे सांगत दस्तुरखुद्द दशरथ बनकर यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.