वैजापूर शहरात महिलेच्या अडीच लाखांच्या सोन्याच्या बांगड्या चोरी, बॅंकेतूनही एकाचे अडीच लाख लंपास..

वैजापूर

महिलेच्या पर्समधून चोरट्याने अडीच लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी शहरातील छञपती शिवाजी महाराज स्मारक परिसरा दरम्यान घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या एका घटनेत शहरातील एका बॅंकेतून ग्राहकाचे अडीच लाखांची रक्कम लंपास झाली.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी देसाई या छञपती संभाजीनगर येथील मयुरपार्क परिसरात रहिवासास आहेत. दरम्यान त्या रविवारी तालुक्यातील जानेफळ येथे त्यांच्या मुलाच्या सासुरवाडीला आल्या होत्या. सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास त्या वैजापूर शहरातील लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानात सोन्याच्या बांगड्या खरेदी करण्यासाठी गेल्या. यावेळी त्यांनी सोनाराला स्वतःकडे असलेल्या दोन साडे पाच तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या दाखवून तशाच बांगड्या करण्यास सांगितले. 


परंतु त्यांचे बजेट कमी पडल्याने त्यांनी स्वतःच्या बांगड्या पर्समध्ये टाकून दिल्या. यानंतर त्या, त्यांचा मुलगा व सुनेसह जेवणासाठी छञपती शिवाजी स्मारक परिसरात असलेल्या सावता हॉटेलवर जात असताना त्यांना त्यांच्या पर्सची चैन खुली दिसली. याबाबत त्यांनी त्यांच्या मुलाला व सुनेला विचारणा केली. मात्र 'याबाबत आम्हाला काहीच माहित नाही' असे त्यांनी सांगितले. यानंतर बांगड्या चोरी गेल्याची बाब माधुरी यांच्या लक्षात आली. लगेचच त्यांनी वैजापूर पोलिस ठाणे गाठत त्यांच्या साडे पाच तोळे वजनाच्या अडीच लाख रुपये किंमतीच्या बांगड्या चोरी गेल्याप्रकरणी तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान वैजापूर शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियात रकमेचा भरणा करण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाच्या पिशवीला ब्लेड मारून चोरट्याने अडीच लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी उशिरापर्यंत पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.