लाडगाव रस्त्यावर (रोठी परिसर) घडली घटना
वैजापूर
भरधाव हायवा व दुचाकीच्या अपघातात बाप-लेक ठार झाल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी शहरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या लाडगाव रस्त्यावर (रोठी परिसर) घडली. अय्युब मुनीर शहा (४६) व अश्मिरा अय्युब शहा (१२) असे अपघातात ठार झालेल्या बाप-लेकीचे नाव असून अंजुम अय्युब शहा (३५) (सर्व रा. बोलठाण, ता. नांदगाव) असे या अपघातात जखमी महिलेचे नाव आहे.
मृत : अय्युब शहा
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अय्युब शहा हे बोलठाण येथील रहिवासी होते. शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास ते पत्नी अंजुम व त्यांची मुलगी अश्मिरा हे लाडगाव रस्त्याने दुचाकीवर प्रवास करत होते. दरम्यान रोठी परिसरात त्यांची दुचाकी भरधाव हायवाच्या (क्रमांक १७ बीझेड ९९९१) चाकाखाली येऊन अय्युब शहा हे चाकाखाली चिरडले गेले. ते जागीच ठार झाले तर मुलगी अश्मिरा ही गंभीर जखमी झाली. याशिवाय त्यांच्या पत्नीही जखमी झाल्या.
मृत : अश्मिरा शहा
घटना घडताच अश्मिरा व अंजुम यांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अंजुम यांच्यावर प्रथमोपचार करून मुलगी अश्मिरा हिला पुढील उपचारासाठी छञपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र छञपती संभाजीनगर येथे उपचारासाठी जात असताना रस्त्यातच अश्मिराची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून घटनेतील हायवा पोलिसांनी जप्त केला आहे.


Social Plugin