समृद्धी महामार्गावर वाहन चालकाला लुटणाऱ्या चौघांच्या आवळल्या मुसक्या...

वैजापूर पोलिसांची कारवाई : गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त

वैजापूर

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री वाहनचालकास जबर मारहाण करून ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेणाऱ्या चौघा चोरट्यांना वैजापूर पोलिसांनी १० ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास धाड (जि.बुलढाणा) येथून ताब्यात घेतले.  सागर रमेश हिवाळे, धम्मदिप कैलास जाधव (दोघे रा. सिंदी ता जाफ्राबाद जि. जालना), कृष्णा भगवान भोपळे (रा.सोनगिरी ता. जाफ्राबाद जि. जालना) व सुनिल शेषराव चव्हाण (रा.निमखेडा ता जाफ्राबाद जि. जालना) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत. 

 वैजापूर पोलिसांनी चौघा चोरट्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत पाटीलबुवा भिन्नर (व्यवसाय : चालक, रा. शहापूर साईनगर कॅनॉल रोड, चेरपुली ता. शहापूर जि.ठाणे) यांच्याकडे ट्रक (क्रमांक एम.एच. १५ एफव्ही ३०२५) असुन तो ट्रक चालवुन ते कुटुंबाचा उदर्निवाह करतात. दरम्यान ०७ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास ते ट्रक घेऊन मुंबई ते रायपुर येथे समृध्दी महामार्गाने जात होते. यावेळी त्यांच्या ट्रकचा तालुक्यातील गोळवाडी शिवारात चॅनल क्रमांक ४७९ जवळ अपघात झाला. घटना घडल्यानंतर ०९ ऑक्टोबर रोजी त्यांचा ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. त्याठिकाणी भरत भिन्नर त्यांचा मुलगा विकास व दुसऱ्या एका गाडीचा चालक रामदास बांगर हे अपघातग्रस्त ट्रकजवळ थांबलेले होते. 

त्यांना दिवसभर क्रेन न मिळाल्याने ते सर्वजण तेथेच थांबले. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ते ट्रकच्या कॅबिनमध्ये बसलेले असताना तिथे एक ईटीका कार (एमएच १० सीएन ८९९६) येऊन थांबली. यावेळी वाहनातून चारजण खाली उतरले व त्यांनी ट्रकची काच फोडून त्यातील एकाने भरत यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण करून त्यांना जखमी केले. या घटनेदरम्यान आलेल्या चोरट्यांनी भरत यांच्याकडील ३० हजार रुपये व १२ हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून घटनास्थळाहुन चौघा चोरट्यांनी धूम ठोकली. दरम्यान घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक व गुप्त माहिती आधारे सदरील गुन्हा हा सागर हिवाळे, धम्मदिप जाधव, कृष्णा भोपळे व सुनिल  चव्हाण यांनी केल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा निष्पन्न होताच वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार किरण गोरे, रावसाहेब रावते, गणेश कुल्हट व अनिल दाभाडे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथून जाऊन त्या चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी चोरट्यांकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला असून घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.