वैजापूर ग्रामीण -१ मध्ये बिबट्याचा थरार !! :

परिसरातील नागरिकांत घबराटीचे वातावरण

वैजापूर
वैजापूर शहरालगत बिबट्याने धुमाकुळ घातल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बुधवारी रात्री शहरापासून थोड्याच अंतरावर फुलेवाडी रस्त्यावर बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांची भंबेरी उडाली होती.



दरम्यान बुधवारी रात्री वैजापूर -ग्रामीण - १ मध्ये या बिबट्याने एका वासराचा फडशा पाडला, तर दुसऱ्या दिवशी एका पाळीव श्वानावावर देखील हल्ला केल्याने ग्रामस्थांत दहशत पसरली आहे. शहराच्या अगदी जवळ हा प्रकार घडल्याने बिबट्याचा शिरकाव शहरात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या मते, गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात बिबट्याच्या हालचाली सुरू आहेत. बुधवारी एका शेतकऱ्याच्या वासराचा फडशा पाडल्याचे आढळले, तर दुसऱ्या दिवशी एका घराजवळील पाळीव कुत्र्यावर हल्ला झाला. 

या दोन्ही घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बिबट्याचे पायाचे ठसे विविध ठिकाणी दिसून आल्याने त्याच्या उपस्थितीला पुष्टी मिळाली आहे.  जिल्हा बँकेचे संचालक डॉ दिनेश परदेशी यांनी गुरुवारी  बिबट्याला हुडकून जेरबंद करण्याची मागणी वनविभागाकडे केली होती. यापार्श्वभूमीवर वैजापूर ग्रामीण क्रमांक १ मधील शेत गट क्रमांक १०५ मध्ये बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा बसवण्यात आला आहे. "गावात लहान मुलं, जनावरे आणि वृद्ध नागरिक आहेत. रात्री बाहेर पडायलाही लोकांना भीती वाटते," असं त्यांनी सांगितलं. ग्रामस्थांच्या मागणीनंतर बुधवारी रात्री वनविभागाच्या पथकाने तत्काळ कारवाई केली.  ग्रामपंचायतीने नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं आहे. "संध्याकाळीनंतर मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नका, शेतात एकट्याने जाणं टाळा, आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास लगेच ग्रामपंचायती किंवा वनविभागाशी संपर्क साधा," असं आवाहन करण्यात आलं आहे.