दोघेही वैजापूर तालुक्यातील भगूर येथील रहिवासी...
वैजापूर
खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी विद्यार्थ्याचा बडून मृत्यू झाल्याची घटना ११ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास रांजणगाव नरहरी (ता. गंगापूर) येथे घडली. दरम्यान एनडीआरएफच्या पथकाने सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांचा शोध घेऊन दोघांनाही मृतावस्थेत बाहेर काढले. दोघेही वैजापूर तालुक्यातील भगूर येथील रहिवासी आहेत.
मयूर किशोर मोईन व साहिल संतोष झाल्टे(दोघांचेही वय १५ वर्षे रा.भगूर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मयूर व साहिल हे दोघे वैजापूर तालुक्यातील भगूर येथील रहिवासी असून ते महालगाव येथील न्यू हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होते.
आज परीक्षा आटोपल्यानंतर ते तेथूनच साधारणतः सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रांजणगाव नरहरी (ता. गंगापूर) परिसरातील खदानीत पोहण्यासाठी गेले असता दोघेही पाण्यात बुडाले. परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी ही माहिती ग्रामस्थांना कळवली. घटनास्थळी विद्यार्थ्यांच्या दफ्तरासह ओळखपत्र व चपला आढळून आल्या. त्यामुळे नागरिकांचा संशय बळावला. त्यामुळे सुरवातीला पोहणाऱ्यांमार्फत दोघांचाही शोध घेण्यात आला.
परंतु ते सापडले नाही. ग्रामस्थांनी तातडीने पोलिस आणि बचाव पथकाला कळवले. संध्याकाळी पाच वाजल्यापासून एनडीआरएफ पथक व ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली. छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमन दलाच्या टीमने सायंकाळी सहाच्या सुमारास दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून शिल्लेगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी गर्दी केली होती. शोध कार्यासाठी पीएसआय लक्ष्मण भोजने, विनोद बिघोत, अग्निशमन दलातील लक्ष्मण कोल्हे, दिनेश मुगशे, विशाल घरडे, प्रणाल सूर्यवंशी, छत्रपती केकन, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड व मन्सुब सपकाळ यांनी पुढाकार घेतला.


.jpg)

Social Plugin