वैजापुर
सायबर गुन्ह्यात झपाट्याने होणारी वाढ बघता सायबर गुन्हयांबाबत जनजागृती करण्यासाठी वैजापूरात छत्रपती संभाजीनगर येथील सायबर पोलीस ठाणे (ग्रा.) यांच्यावतीने महाराष्ट्र सायबर सेलच्या सायबर जनजागृती (अवेअरनेस) मास-२०२५ या मोहिमे अंतर्गत शहरातील बस स्थानकासह एका शाळेतील विद्यायार्थांना 'सायबर साक्षर' बनविणेसाठी सायबर तज्ञांनी (एक्सपर्ट) मार्गदर्शन केले.
सध्याच्या घडीला सायबर गुन्ह्यात एखादी निरागस व्यक्ती अथवा परिवार कसे फसले जातात ? या परिस्थितीत नागरिकांनी कोणकोणती सुरक्षितता बाळगावी ? यासाठी शहरातील देवगिरी इंटरनॅशनल स्कुल येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी सायबर पोलिसांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दैनंदिन कामकाजात नागरिक स्वतःचे आधार कार्ड, पॅनकार्ड व तत्सम ओळखपत्र सहज कोणासही उपलब्ध करुन देतात. यापार्श्वभूमीवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक होते. अशा घटना वारंवार घडू नये याकरिता भारत सरकारचे डीजीलॉकर अॅप्लीकेशन वापरुन १२ अंक असलेला आधार क्रमांक न देता डीजीलॉकर मधील शेवटचे ०४ अंकच आपले दैनंदिन व्यवहारात देण्यात यावे, आधार लॉक करुन ठेवण्यासाठी एम आधार अॅप्लीकेशनमधून आधार कार्ड लॉक केल्यास कोणतीही ओटीपी येणार नाही. यामुळे आधार, ओटीपीच्या माध्यमातून होणारी फसवणुक बंद होईल. याशिवाय अॅन्ड्रॉइड मोबाईल मधील इन्स्टॉल केलेले अॅप्लीकेशन्स हे अनइंस्टॉल केल्यानंतरही आपली सुरक्षितता बाळगण्यासाठी करावयाची प्रक्रिया समजावून सांगितली. दरम्यान देशात डिजीटल अरेस्ट अशी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया नसताना काही लोक बनावट पोलिस अधिकारी बनून डीजीटल अरेस्टच्या नावाखाली व्हीडीओ कॉल करून नागरिकांकडून मोठ्या रकमेची मागणी करुन फसवणुक करतात. अशा घटना घडू नये यासाठी मोबाईलमध्ये जे नंबर सेव्ह केलेले नाहीत त्यांचे व्हॉटसअॅप व्हिडीओ कॉल, अॅडीओ कॉल, चॅटींग करणे टाळावे.
याशिवाय सोशल मीडीया इस्टाग्राम, फेसबुक, व्हॉटसअॅप याचे सुरक्षित वापर कसा करावा, इतर व्यक्तींचे फोटो लावून सोशल मीडीया खाते (अकाउंट) वापरल्यास आणि त्याद्वारे केलेली चॅट किंवा अकाउंट हँडल केल्यास गुन्हा दाखल करण्यात येतो याबाबत देखील यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. देवगिरी ग्लोबल स्कुलच्या मुख्याध्यापिका वर्मा, शिक्षक वृंद व इतर कर्मचाऱ्यांनी, विद्यार्थी व पालकांनी देखील रोजनिशीच्या व्यवहारात सायबर साक्षर कसे बनावे ? याबाबत सायबर पोलिसांनी मार्गदर्शन केले. याशिवाय वैजापुर बसस्थानकात जावून बसस्थानकातील सर्व प्रवासी, विद्यार्थी व एसटीचे सर्व कर्मचाऱ्यांनी, वृद्धांनी व तरुणांनी दैनंदिन कामकाजात घ्यावयाची काळजी व स्वतःचे सर्व ओळखपत्र (आयडेंटीटी) कोठेही अनोळखी लोकांना शेअर करु नये तसेच तेथील प्रवासी यांनी विचारलेली प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांनाही सायबर साक्षर बनणे काळाची गरज असल्याबाबत जनजागृती केली. आगार प्रमुख पगारे व सर्व कर्मचाऱ्यांनी यावेळी सायबर पोलिसांना सहकार्य केले.
छ. संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक (ग्रा.) डॉ. विनयकुमार राठोड यांनी स्वतः जिल्ह्यात सायबर जनजागृती करण्यासाठी सुचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने वैजापूरात पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, सफौ कैलास कामठे, संतोष तांदळे, दत्ता तरटे, योगेश मोईम, गणेश घोरपडे, सविता जायभाये, मुकेश वाघ, राजेश राठोड, शितल खंडागळे, पुजा म्हस्के (सायबर पोलीस ठाणे) यांनी ही मोहिम यशस्वीपणे राबविली. सायबर गुन्हयांपासुन सावध राहा, कोणत्याही संशयास्पद संदेशावर विश्वास ठेवु नका, अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका असे देखील आवाहन यावेळी पोलिसांच्या वतीने करण्यात आले.


.jpg)
.jpg)
Social Plugin