वैजापूरात धुमस्टाईल भामटे पोलिसांच्या गळाला...

नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

वैजापूर

महिलेचे मंगळसूत्र हिसकवताना धुमस्टाईल आलेल्या दोघांना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पकडल्याची घटना शहरातील रचना कॉलनी परिसरात ०८ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. मुनीर युसुफ शेख (रा. दत्तनगर, एमआयडीसी रोड, श्रीरामपुर जि. अहिल्यानगर व  किरण राजू शिंदे (रा. कांदामार्केट, श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची  नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शितल
 विशाल दांगोडे या लाडगाव रोडलगत असलेल्या रचना कॉलनी येथील रहिवासी आहेत. दरम्यान सोमवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास त्या  मुलाची शाळा सुटल्याने मुलाला सोबत घेऊन घराकडे परतत होत्या. यावेळी अचानक दोघेजण मोटारसायकलवर (एमएच १७ एबी १५३७)  त्यांच्याजवळ आले. काही-एक समजण्याच्या आत दुचाकीवर मागे बसलेल्या एकाने त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा प्रयत्न फसला. यावेळी मोटारसायकल चालवत असलेल्या दुसऱ्या एकाने गाडी थांबवून शितल यांच्या गळ्यातील चैन हिसकाविण्याचा प्रयत्न केला. परंतु शितल यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील लोक तिथे जमा झाले या गरबडीत दोघे भामटे गाडीवरून खाली पडले. घटनेची माहिती मिळताच गोपनीय शाखेचे पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर मेटे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व दोघा भामटयांना नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतले. थोड्या वेळात तिथे वैजापूर पोलिसांचे पथक देखील पोहचले. पोलिसांनी दोघा भामटयांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव-गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव मुनीर शेख व किरण शिंदे (रा.श्रीरामपूर)असल्याचे पोलिसांना सांगितले. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून शितल दांगोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.