समृद्धी महामार्गावरील हडसपिंपळगाव शिवारातील घटना
वैजापूर
समृद्धी महामार्गावर वाहनातून डिझेल चोरी करणाऱ्या टोळक्यातील एकाला पोलिसांनी १५ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास वाहनासह ताब्यात घेतले. तालुक्यातील हडसपिंपळगाव शिवारात चॅनल क्रमांक - ४७० जवळ ही घटना घडली. याप्रकरणी प्रशांत गणेश गायकवाड (रा. कोळघर ता.जि.छ. संभाजीनगर) व त्याचे इतर तीन साथीदाराविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राममिलन केमला साहु (रा.डिहीया नत्रिक पुर ता. गोविंगगड जिल्हा- रिवा राज्य मध्यप्रदेश) हे शनिवारी मध्यरात्री समृद्धी महामार्गाने अशोक लेलंड कंपनीचे ट्रेलर (एमएच ५६ बीएफ ३७०३) घेऊन जात होते. त्यांच्यासह सातेंद्र साहू हे देखील ट्रेलर (एमएच ४६ बीबी ०२८५) घेऊन जात होते. दरम्यान समृद्धी महार्गावर हडसपिपळगाव शिवारातील चॅनल क्रमांक ४७० जवळ सातेंद्र साहू यांच्या वाहनाचे लाईट बंद झाले. त्यांनी लगेचच राममिलन यांना फोन लावून याबाबत कळविले. त्यामुळे राममिलन यांनी वाहन थांबवले. मागून सातेंद्र हे त्यांचे ट्रेलर घेऊन तिथे पोहचले. वाहनाचे लाईट बंद असल्याने दोघांनी महामार्गालगत वाहने थांबवली. सकाळ झाल्यानंतर आपण येथून पुढील प्रवासासाठी निघू असे त्यांनी ठरवले. दरम्यान पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या ट्रेलरसमोर काही लोकांनी स्कॉर्पिओआडवी लावली. यावेळी राममिलन यांच्या वाहनातून तिघेजण डिझेल चोरी करताना त्यांना दिसून आले. नेमके यावेळी त्याठिकाणी वैजापूर पोलिसांचे वाहन देखील आले. पोलिस आल्याचे लक्षात येताच तिघांनी तिथून पळ काढला. परंतु स्कॉर्पिओमधील एकाला पोलिसांनी वाहनासह ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला त्याचे नाव-गाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रशांत गायकवाड (रा. कोळघर ता.जि.छ. संभाजीनगर) असे असल्याचे सांगितले. पोलिसांनी लगेचच स्कॉर्पिओसह निळ्या रंगाच्या १५ कॅन्स, डिझेल चोरी करण्यासाठी लागणारे दोन छाटे पाईप व ४० लीटर डिझेल जप्त केले.रामकिसन साहु यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत गायकवाड व इतर तिघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Social Plugin