वैजापूर तालुक्यात पावसाचे थैमान : हजारो हेक्टर पीक पाण्याखाली..

शहरातील सखल भागातील घरांत शिरले पावसाचे पाणी

वैजापूर
शनिवार दुपारपासून शहरासह ग्रामीण भागात पावसाने अक्षरशः थैमान घातले असून तालुक्यातील १२ महसुल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. रविवारी सकाळपर्यँत सर्वच नदी नाले ओसंडून वाहत आहे तर बहुतेक ठिकाणी पावसाचे पाणी शेतात शिरल्याने हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. या पावसामुळे तालुक्यातील बळीराजा आता पूर्णतः मेटाकुटीला आला आहे. 


तालुक्यातील हजारो हेक्टर शेतात पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान शनिवारी पहाटे वैजापूर शहरालगत असलेल्या नारंगी मध्यम प्रकल्प ९७ टक्के भरला असून प्रकल्पातून १५०० क्यूसेकने विसर्ग सोडण्यात आला. या विसर्गामुळे शहरातील सखल भागात पाणी साचल्याने ५० पेक्षा अधिक कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले. आमदार रमेश बोरनारे व डॉ. दिनेश परदेशी यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनील स्थलांतरित कुटुंबांसाठी खाद्य पदार्थांसह पिण्याच्या पाण्याची सोय केली. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह आमदार बोरनारे यांनी शहर व ग्रामीण भागातील प्रभावित भागांचा दौरा केला. याशिवाय जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी यांनी देखील तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. शनिवारी रात्रीपासून प्रशासनाच्यावतीने तहसिलदार सुनील सावंत व पालिका मुख्याधिकारी भागवत बिघोत हे देखील परिस्थितीवर लक्ष देऊन होते.


पालकमंत्री संजय शिरसाट यांनी ग्रामीण भागात पाहणी केली.


पंचशिलनगरसाठी २५ कोटी !!

शहरातील पंचशीलनगर परिसरातील बाधित कुटुंबियांना घर बांधून देण्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ असा शब्द पालकमंत्री शिरसाट यांनी त्यांच्या या भेटी दरम्यान दिला. याशिवाय ग्रामीण भागातील बाधित शेतकऱ्यांना देखील त्यांनी राज्यशासनाकडून लवकरात-लवकर मदत उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला. 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा..

शहरातील छत्रपती मंगल कार्यालयात बाधित कुटुंबियांचे स्थलांतर करण्यात आले. यावेळी आमदार रमेश बोरनारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाधित कुटुंबातील सदस्यांशी फोनवर चर्चा घडवून आणली. या चर्चेत प्रशासनाकडून बाधित कुटुंबियांना पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल असा शब्द उपमुख्यमंत्री शिंदे यांनी  दिला. दरम्यान रविवारी सकाळपर्यंत तालुक्यातील सर्वच १३ महसूल मंडळात अतिवृष्टी (६५ मिलिमीटर पेक्षा अधिकचा पाऊस) झाल्याची नोंद झाली आहे.


शनिवार दुपारपासून रविवारी सकाळपर्यँत तालुक्यातील १२  महसूल मंडळात झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे :- 

वैजापूर - १७४.८,  खंडाळा - १७२.५, 

शिऊर - १८९.३,    बोरसर - १८९.३

लोणी - १७२.२,     गारज - १५१.०

    लासुरगाव - १२७.८

महालगाव - १७३.३, नागमठाण - १७३.३

घायगाव - १६४.८,    जानेफळ - १७५.०

बाबतारा - १७१.०