स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर तिच्या पतीला केले अटक...


वैजापूर

पत्नीला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाच्या छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे येथे मुसक्या आवळल्या. दत्तात्रय कचरु जेजुरकर असे पोलिसांनी पकडलेल्या पती महाशयाचे नाव आहे.


स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दत्तात्रय जेजुरकर याला पुण्यातून अटक केले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन-२००८ मध्ये निर्मला दत्तात्रय जेजुरकर (रा. खंडाळा ता. वैजापुर) यांना पती दत्तात्रय जेजुरकर याने विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.  यावरुन वैजापूर पोलिस ठाण्यात गुरन ९९/२००८ कलम ४९८ (अ), ३०७,३४२,३२३,५०४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान दत्तात्रय हा सन-२०१२ पासुन  न्यायालयाच्या तारखेस हजर न झाल्याने  न्यायालयाने त्याच्याविरुद्ध स्टॅण्डिंग वॉरन्ट ऑफ अरेस्ट काढलेले होते. तरी देखील तो तारखेस हजर होत नव्हता. याकाळात दत्तात्रय व त्याच्या नातेवाईकांनी  मिळून सन २०२४ मध्ये त्याच्या नावे असलेली वडीलोपार्जित जमीन ही निर्मला  यांना न कळविता दुय्यम निबंधक कार्यालय वैजापुर येथे गट क्रं ७२५ ची खरेदी विक्री संमती देण्यासाठी हजर झालेला होता. त्यामुळे निर्मला या सासरे, दीर व इतर नातेवाईकांना  वेळोवेळी पती (दत्तात्रय) कुठे आहे ? याबाबत विचारणा करून 'तुम्ही त्यांना जमीन विक्री करण्यासाठी मदत करतात तुम्हाला तो (पती) कुठे आहे ? याबाबत माहिती आहे. तुम्ही मला त्याची माहिती द्या' असे कळविले. परंतु ते निर्मला यांना कोणत्याही प्रकारे सहकार्य करीत नसल्याने निर्मला यांनी पोलीस अधिक्षक, छत्रपती संभाजीनगर (ग्रा.) यांना त्यांचा पती हा न्यायालयाच्या तारखेस हजर राहत नसुन  न्यायालयाची व पोलीसांची दिशाभुल करीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावरून स्थागुशाचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी एक विशेष पथक तयार करून दत्तात्रय याची माहिती काढणे बाबत सुचना दिल्या. सदर पथक मागील तीन महिन्यांपासुन त्याचा शोध घेत होते. परंतु तो वारंवार एकाच जागी थांबत नसे. तसेच त्याचे नातेवाईक देखील पोलिसांची दिशाभुल करित असत. सदरचा तपास करीत असतांना पथकास तांत्रिक विश्लेषणाच्या व गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाली की,  दत्तात्रय जेजुकर हा रांजणगाव (पुणे) येथे कंपनीत सेक्युरीटी म्हणुन काम करत आहे. पथकाने त्याला २७ सप्टेंबर रोजी पुण्यातून ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी वैजापूर पोलिस ठाण्यात हजर केले. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार  राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपुत,  सपोनि संतोष मिसळे, पोउपनि भागिनाथ वाघ, पोह संतोष पाटील, पोअं राहुल गायकवाड, पोअं योगेश तरमळे, पोअं जीवन घोलप यांच्या पथकाने केली.