उपविभागीय डॉ.अरुण जऱ्हाड यांचे आदेश
वैजापूर
अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीस आलेल्या पुरपरिस्थितीत शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे घरांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. यादरम्यान तालुक्यातील नारायणपुर येथे गोदावरी नदीपात्राच्या प्रवाहात काही कुटुंब अडकुन पडले. मात्र याबाबत वरिष्ठांना कुठलीही माहिती न देणे, त्याठिकाणी मदतकार्य सुरू असताना उशिरा पोहचणे हे एका तलाठयाला चांगलेच भोवले असून उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी 'त्या' तलाठ्याला निलंबीत केले आहे.
अमोल पोपट काळे (तलाठी, सजा पुरणगाव) असे निलंबीत करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, २८ सप्टेंबर रोजी नारायणपूर येथे झालेल्या अतिवृष्टी दरम्यान अनेक शेतकऱ्यांना याचा तडाखा बसला याशिवाय अनेक कुटुंब पुराच्या पाण्यात अडकले. मात्र सजेचे तलाठी अमोल काळे यांनी याबाबतची कुठलीही माहिती तहसिल कार्यालय अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणुन दिली नाही. तसेच मौजे नारायणपुर येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना मदत कार्य चालु असता तलाठी अमोल काळे हे तेथे खुप उशिराने पोहचले. तत्पूर्वी साजातील शेतकरी व ग्रामस्थ यांनी देखील तलाठी काळे यांच्याविरुद्ध तक्रारी केल्याने त्यांना याबाबत सुचना देखील देण्यात आल्या होत्या. परंतु त्यांच्यात कोणतीही सुधारणा झालेली दिसुन आली नाही. दरम्यान ३० सप्टेंबर रोजी खासदार संदीपान भुमरे, आमदार रमेश बोरनारे व उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी तालुक्यातील अतिवृष्टी भागास भेट दिली असता तलाठी काळे हे मुख्यालयी अनुपस्थित असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. जऱ्हाड यांच्या निदर्शनास आले. याशिवाय ३० सप्टेंबर रोजी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेती पिकांचे व बाधित व्यक्तींचे घरे /विहीर इत्यादी बाबींचे पंचनामे करून बाधितांना शासनाची मदत देण्याचाबतचे निकष व निर्देश याबाबत पंचायत समीती सभागृह (वैजापूर) येथे बैठक व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी तलाठी काळे यांनी बैठकीस कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता गैरहजर आढळून आले. यापार्श्वभूमीवर तहसिलदार यांचा प्रस्ताव व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांचे कामकाजातील हलर्गीपणा लक्षात घेता तलाठी अमोल काळे (पुरणगाव) यांनी उपविभागीय कार्यालय व लगत वरिष्ठ कार्यालय प्रमुखांकडून देण्यात आलेल्या आदेशांचे /निर्देशांचे गांभीर्याने पालन करणे आवश्यक असतांनाही तशी कृती त्याच्याकडून झालेली नाही. यामुळे तलाठी अमोल काळे यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ च्या निच्म ३ (एक), (दोन), आणि (एकोणीस) चा भंग व नैसर्गिक आपत्ती अधिनियम २००५ चा भंग केला असल्याचे निदर्शनास आल्याने उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल नियम १९७९ चे कलम ४ (१) अ अन्वये त्यांना प्राप्त अधिकारानुसार तलाठी अमोल काळे यांना शासन सेवेतून ३० सप्टेंबर रोजी निलंबीत करण्याचे आदेश निर्गमित केले.
.jpeg)
Social Plugin