ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी हे अभियान महत्वाचा टप्पा : आमदार रमेश बोरनारे
वैजापूर
राज्यात १७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५" अंतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची संधी उपलब्ध होणार असून, सरपंचांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन करत ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी हे अभियान महत्वाचा टप्पा ठरणार असल्याचे आमदार रमेश बोरनारे यांनी येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित कार्यशाळेत बोलताना सांगितले.
१७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत “सेवा पंधरवाडा” अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येणार आहे. या कार्यशाळेचा शुभारंभ येथील पंचायत समिती सभागृहात दीपप्रज्वलनाने करण्यात आला.
यावेळी उपस्थित अधिकारी, जनप्रतिनिधी, ग्रामपंचायत प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना आमदार रमेश बोरनारे यांनी या अभियानाचा उद्देश हा प्रत्येक ग्रामपंचायत सक्षम व गतिमान करणे, विकासासाठी आरोग्यदायी स्पर्धा निर्माण करणे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, ग्रामस्थांना पाणी, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे,ग्रामपंचायत कर वसुलीद्वारे आर्थिक उत्पन्न वाढवणे, लोकसहभागातून गावांच्या सर्वांगीण विकासाला गती देणे असल्याचे सांगितले. या कार्यशाळेत ग्रामविकास, शाश्वत प्रगती, गावांचे सशक्तीकरण व लोकसहभाग वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण माहितीचे आदानप्रदान झाले. “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” हे प्रत्येक गावाला आत्मनिर्भर व समृद्ध करण्याच्या दिशेने प्रभावी पाऊल ठरणार असल्याचे मत आमदार बोरनारे यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin