व्यापाऱ्यांनी दिला मुगाला मनमानी भाव
वैजापूर
शिऊर येथील उपबाजार समितीत शेतकऱ्यांनी लिलावासाठी मूग आणला खरा मात्र 'व्यापाऱ्यांचे आले मना तेथे कोणाचे चालेना' असा प्रकार झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच पिळवणुक झाली. दरम्यान दिवसभर लिलाव न झाल्याने शेतकरी अक्षरशः उपाशीपोटी उपबाजार समितीत थांबून होते.
त्याचे झाले असे, बुधवारी सकाळी व्यापारी व हमाल यांच्यात किरकोळ वाद झाला होता. मात्र या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी त्याचा राग थेट शेतकऱ्यांनी आणलेल्या मालावर काढत दुपारी साडेबारा वाजता सुरू होणारा लिलाव थेट संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत लांबविला.
त्यातही भर म्हणजे शेतकऱ्यांनी आणलेला मुगाला व्यापाऱ्यांनी साडे सहा ते सात हजारांपर्यंत भाव देऊन ‘जबरदस्तीने’ मोकळे करण्याचा प्रकार उघडकीस आला. खास म्हणजे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल टाळण्यासाठी “जागा नाही” असे कारण पुढे केल्याचे समजून आले. शिऊर उपबाजार समितीत भुसार माल खरेदीसाठी अवघे चारच व्यापारी असून, सकाळी एका व्यापाऱ्याचा हमालाशी वाद झाल्यानंतर उरलेले तिघे व्यापारी लिलाव न करण्याच्या हट्टावर ठाम होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा अक्षरशः संयम सुटण्याची वेळ आली होती.
व्यापारी-हमाल वाद, शेतकऱ्यांना दिवसभर ताटकळत ठेवणे, मुगाच्या दरात झालेले मनमानी चढउतार यामुळे शिऊर उपबाजार समिती पुन्हा एकदा चर्चेत येऊन शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीचीच ठरली आहे. या घटनाक्रमानंतर सायंकाळी उशिरा काही शेतकऱ्यांनी आपल्या संतापाला जागा मोकळी करत 'आम्ही जीवाचे रान करून शेतीमाल पिकवतो. परंतु वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार काय ? किंवा उप बाजार समितीत काय ? आम्हाला बहुतेकदा वेठीसच धरले जाते. हा प्रकार थांबला नाही तर यापुढील काळात शेतकरी थेट रस्त्यावर उतरतील असे सांगितले.
"मी सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. याबाबत मला माहिती नाही. मात्र उद्या यासंदर्भात बैठक बोलावली आहे."
रामहारी जाधव
(सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, वैजापूर)
"आम्ही सकाळी माल आणला. वाद मिटला असे वाटले. पण व्यापाऱ्यांनी दिवसभर लिलाव केला नाही. दुपारी जर सांगितले असते की लिलाव होणार नाही, तर आम्ही आमचा माल दुसरीकडे नेला असता. उपबाजार समिती शेतकऱ्यांसाठी नेहमीच दूर्दैवी ठरत आहे."
हरिभाऊ मुळे (शेतकरी)

Social Plugin