तालुक्यातील शिवगाव येथील घटना : शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
वैजापूर
तालुक्यातील शिवगाव येथे हॉटेलच्या जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादाचे रुपांतर थेट एका महिलेला मारहाणीत झाले. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संतोष बम्हणवत (रा. शिवगाव) याच्या विरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगलबाई काकरवाळ या शिवगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्या मुलाचे गावातच हॉटेल आहे. ५ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास, त्यांचा मुलगा व संतोष बम्हणवत यांच्यात हॉटेलमधील जेवणाचे बिलावरून वाद झाला. या वादानंतर संतोष हा थेट मंगलबाई यांच्या घरी आला आणि त्यांच्या पती व सासुला शिवीगाळ करू लागला. मंगलबाई यांनी मध्यस्थी करत संतोषला समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु संतोषने उलट मंगलबाई यांनाच चापट-बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने जमिनीवर पडलेली लाकडी काठी उचलून त्यांच्या डोक्याला जबर मारहाण केली. ज्यात त्यांना दुखापत झाली. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार किशोर आघाडे करत आहेत.
Social Plugin