वैजापूर तालुक्यातील महालगाव येथील घटना
वैजापूर
पोलिस असल्याची बतावणी करून दुचाकीवर आलेल्या भामटयांनी महिलेचे सहा तोळयांचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केल्याची घटना तालुक्यातील महालगाव येथे २१ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी विरगाव पोलिस ठाण्यात दोघा भामटयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तारा प्रल्हाद चव्हाण या तालुक्यातील भगूर येथील रहिवासी आहेत. दरम्यान गुरुवारी दुपारी त्या पतीसह दुचाकीने छत्रपती संभाजीनगर येथे नातलगाकडे जात होत्या. महालगाव येथे पोहचताच त्यांच्या जवळ मोटरसायकलीवर दोघेजण आले व त्यांना म्हटले की, 'आम्ही पोलिस आहोत, पुढे गंगापूरला दंगल चालू आहे. तुम्ही तुमच्याकडील सोने हे बॅग मध्ये व्यवस्थित ठेवा' त्यांनी असे सांगितल्याने तारा चव्हाण यांनी त्यांच्याकडील चार तोळ्यांची गंठण, एक तोळ्याचे मनीमंगळसूत्र व एक तोळ्याची अंगठी असे सहा तोळे सोने काढले. या दरम्यान आलेल्या भामटयांनी हे सोने त्यांच्याकडे घेऊन हातचलाखीने कागदाच्या पुडीत खडे टाकून ही पुडी महिलेच्या पिशवीत टाकून घटनास्थळाहुन धूम ठोकली. थोड्यावेळात घडलेला सर्व प्रकार महिलेच्या लक्षात आला. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरून विरगाव पोलिसांत चोरीसह फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक माने हे करित आहेत.

Social Plugin