वैजापूरात बैलपोळा उत्साहात साजरा

शेतकऱ्यांनी पशुधनांना सजवून व नवैद्य दाखवून साजरा केला सण

वैजापूर

'श्रमाला मोल नाही व श्रमकरी हा देवासमान' असतो हाच संदेश पोळा या सणाच्या माध्यमातून मिळतो. असा हा पोळा सण ता. २२ ऑगस्ट रोजी पशुधनाची पूजा करून शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.


यंदा तालुक्यातील पिकपरिस्थिती बऱ्यापैकी आहे. मध्यंतरीच्या काळात पावसाने उघडीप दिली खरी मात्र मागील पाच-सहा दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा 'कमबॅक' केल्याने तालुक्यातील बऱ्याच भागात पीक परिस्थिती ठीक आहे. 



त्यामुळे मागील दोन दिवसांपासून पोळा या सणाला बळीराजाच्या आनंदाची झालर लागल्याचे चित्र बाजारपेठेतील  गर्दीवरून जाणवत होते. शुक्रवारी दुपारी चार वाजेनंतर बहुतेक ठिकाणी पशुधनांना  पंचाआरती ओवाळून,पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून शिंगांना हिंगुळ व बेगड लाऊन,गळ्यात घुंगराच्या माळा,पाठीवर रंगबेरंगी झुल टाकुन शेतकऱ्यांनी सजविले होते. तर बुद्धी व चपळतेची देवता असलेल्या मारुती या देवतेचे दोन्ही गुण पशुधनाला मिळावे या हेतूने शेतकरी वेशीलगत असलेल्या मारुती मंदिरात पशुधन नेत होते. त्यानंतर बहुतेक ठिकाणी सर्जा-राजाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.