वैजापूर तालुका शेतकरी संघटनेची स्थापना

संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश तांबे

वैजापर

वैजापूर तालुका शेतकरी संघटनेची स्थापना करण्यात आली असून संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश तांबे यांची एकमुखी निवड करण्यात आली. २३ ऑगस्ट रोजी येथील बाजार समितीच्या मिटिंग हॉलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



वैजापूर तालुका शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना गणेश तांबे


मागील काही दिवसांपूर्वी सागर राजपूत या कांदा व्यापाऱ्याने सुमारे ४०० शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांना 'हात दाखवला'. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला. मात्र या घटनेदरम्यान आर्थिक फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येत बाजार समिती प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले व उपोषणाचे अस्त्र उपसले तर काहींनी शहरातील पाण्याच्या टाकीवर जाऊन 'शोले स्टाईल' आंदोलन देखील केले. अखेर शेतकऱ्यांच्या आंदोलनासह एकजुटीची दखल घेत बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांना कांदा व्यापाऱ्यांने 'हात दाखविलेल्या' रकमेपैकी ९० टक्के रक्कम परत केली. अर्थातच यासाठी आमदार रमेश बोरनारे यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाला जागत रक्कम परत मिळवून देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला. याशिवाय जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी यांनी देखील बाजार समिती व शेतकऱ्यात सलोखा घडवून आणण्यात महत्वाचा वाटा उचलला. राज्यात कुठल्याही बाजार समितीत अशा प्रकारचा निर्णय घेणारी 'वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती' पहिली बाजार समिती ठरली. या पार्श्वभूमीवर हा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या एकजुटीचा चांगल्या पैकी उपयोग झाला. या घटनेचीच नाळ धरत या घटनेतील पीडित शेतकऱ्यांनी एकत्र येत भविष्यात शेतकऱ्यांना बाजार समिती, तहसिल कार्यालय,पंचायत समिती, कृषी विभाग या व इतर ठिकाणी येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी एकत्र येऊन शनिवारी वैजापूर शेतकरी संघटनेची स्थापना केली.


गणेश तांबे यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड...


निवडीनंतर संघटनेचे अध्यक्ष गणेश तांबे यांनी बोलताना सांगितले की, शेतकऱ्यांचा एकजुटीचा उपयोग हा शेतकऱ्यांच्या हितासाठी कशा प्रकारे होऊ शकतो हे आपण मागील काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. दरम्यान बाजार समितीत कांदा अथवा मका विक्रीसाठी आणल्या नंतर हायड्रोलीक वाहनांमुळे मजुरांच्या हाताने वाहन खाली करण्याचा संबंधच येत नाही. असे असताना देखील शेतकऱ्यांकडून प्रत्येक वाहनामागे ३०० रुपये वसूल केल्या जातात. अशा पद्धतीने दिवसागणिक शेतकऱ्यांकडून दीड लाख रुपये तर महिन्याकाठी लाखोंने रक्कम उकळल्या जाते. याबाबत बाजार समितीकडे विचारणा केली असता 'हा नियम असून बदलता येत नाही' असे उत्तर मिळते. मात्र सणासुदीच्या काळात बाजार समितीत सर्वचजण दोन-दोन महिन्याचा आगाऊ पगार उचलतात. शेतकऱ्यांच्या हिताचा विषय काढल्यास सर्वांना नियमांची आठवण होते. मात्र त्यांची स्वत: पैसे उचलण्याची वेळ आल्यास सर्वच नियम धाब्यावर बसवले जातात. याशिवाय शेतकऱ्यांना शेतात विहीर घेण्यासाठी कुठलाही नियम नसताना तीस हजार रुपयाने संबधीत विभागाची 'झोळी' भरावी लागते.  तलाठ्यांकडून साधा फेर जरी ओढ्याचा असल्यास तिथेही शेतकऱ्याच्या 'खिसा चाफल्या'शिवाय काम केले जात नाही. भविष्यात वैजापूर तालुक्यात या व इतर सर्व गोष्टींना आळा घालण्याचे काम 'वैजापूर तालुका शेतकरी संघटना' करणार आहे. संघटनेत काम करण्यासाठी सभासदांना कुठल्याही प्रकारची वर्गणी द्यावी लागणार नसून कुणी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असला तरी ही संघटना राजकारण विरहित राहणार आहे. संघटनेचा उद्देश हा फक्त शेतकऱ्यापासून सुरुवात ते शेतकऱ्यांसाठीच शेवट असा राहणार असल्याचे यावेळी तांबे यांनी सांगितले. या संघटनेत जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी आपली सदस्यता नोंदवावी असे आवाहन देखील त्यांनी केले.