वैजापूरात शांतता समितीची बैठक

आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्याचे पोलिस प्रशासनाचे आवाहन

वैजापूर

आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर वैजापूर पोलिसांच्यावतीने २० ऑगस्ट रोजी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. येथील पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत आमदार रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, जिल्हा बँकेचे संचालक डॉ.दिनेश परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णासिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे, पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक भागवत बिघोत, पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, अकिल शेख, विशाल संचेती यांची प्रमुख उपस्थिती होती.



या बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार रमेश बोरनारे यांनी वैजापूरात सर्वधर्मीय नागरिक एकोप्याने राहतात असे सांगत गणेश उत्सव शांतता व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पाडण्यास सर्व राजकीय नेतेमंडळी  पोलिस प्रशासनास पूर्णपणे सहकार्य करतील अशी ग्वाही दिली. जिल्हा बँकेचे संचालक डॉ दिनेश परदेशी यांनीही प्रशासनास पूर्णपणे सहकार्य करू असे आश्वासन देत गणेश विसर्जन मिरवणुकीत पालिका प्रशासनाकडून आवश्यक असलेल्या मदतीची मागणी केली. याशिवाय पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी निसर्गपुरक असा गणेश उत्सव साजरा करा असे आवाहन करत यंदा गणेश विसर्जनासाठी प्रायोगिक तत्वावर चार कृत्रिम तलाव उभारणार असल्याची माहिती दिली. या बैठकीला माजी नगरसेवक राजेंद्र साळुंके, पारस घाटे, शैलेश चव्हाण, प्रकाश बोथरा, काजी हफिजुद्दीन, मोजम शेख, सोनू राजपूत, प्रशांत शिंदे, मुकेश राजपूत, सपोनि वैभव रनखांब, सपोनि शंकर वाघमोडे, गोपीनाय शाखेचे ज्ञानेश्वर मेटे, रणजीत चव्हाण, योगेश झाल्टे, प्रशांत गीते, पोलिस पाटील, शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.


पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज :
अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णासिंह


या बैठकीला शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः त्यांना संबोधित करताना अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी सांगितले की, आगामी गणेशोत्सवासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज असून याबाबतचा आढावा घेण्यासाठी आम्ही आज शहरात आलो आहोत. आमच्याकडे 'सर्वच याद्या' तयार असून आमचे वैजापूर शहरावर बारकाईने लक्ष आहे. सणासुदीच्या काळात शहरातील महिला मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. यावेळी बाहेर पडणाऱ्या महिलांना स्वतःला व वैजापूर शहरही सुरक्षित वाटायला हवं किंबहुना तुम्हा सर्वांची ही जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.