छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कारवाई
वैजापूर
वडिलोपार्जित क्षेत्रावरील हक्क सोड प्रमाणपत्रावरून फेर घेऊन उताऱ्यावर नाव लावण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याला छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ०६ ऑगस्ट रोजी रंगेहाथ पकडले. गोविंद रामचंद्र सब्बनवाड पद- तलाठी ( वर्ग 3),नेमणूक,सजा : कार्यालय आंचलगाव, ता. वैजापूर, जि, छत्रपती संभाजीनगर, (रा.सुकणी ता. उदगीर, जिल्हा. लातूर, ह. मु.डिसुझा रेसिडेन्सी, ताराराम सोसायटी, पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील तक्रारदार यांचे वैजापूर तालुक्यातील बाभूळतेल येथे शेत गट क्रमांक २४२ मध्ये वडिलोपार्जित ५२आर इतके क्षेत्र आहे. या क्षेत्रावरील हक्कसोड प्रमाणपत्रावरून फेर घेऊन उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तक्रारदार यांनी त्यांच्या आईच्या नावाने १८ सप्टेंबर २०२३ रोजी जमिनीच्या कागदपत्राची फाईल तलाठी गोविंद सब्बनवाड यांना दिली होती. मात्र हे काम करण्यासाठी सब्बनवाड याने तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने याबाबत तक्रारदार यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून ला.प्र.वि. बुधवारी तालुक्यातील लोणी (खु) येथील एका झेरॉक्स दुकानात सब्बनवाड याला दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदरची कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील ला.प्र.वि.चे पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपधीक्षक बाळासाहेब शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वाल्मिक कोरे, पो.अं.भीमराज जीवडे, राजेंद्र जोशी, प्रकाश डोंगरदिवे यांच्या पथकाने केली.
Social Plugin