पाच जणांविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
वैजापूर
घरात घुसून डॉक्टराला पाच जणांनी बेदम मारहाण करून घरातील साहित्याची तोडफोड केली. ही घटना तालुक्यातील कविटखेड येथे शनिवारी (ता.०२) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीकांत किन्हाळकर (रा. भोकर, जि. नांदेड), परशुराम वाघुळे (रा. हसूल), विठ्ठल शिंदे (रा. भोकर) व इतर दोन अनोळखी इसम असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. राजेंद्र परभतराव बोलधने (वय ४८, रा. बी-४०१, ऑगस्ट होम सोसायटी, उल्कानगरी, छत्रपती संभाजीनगर, ह. मु, बोलधणे वस्ती, कविटखेड, ता. वैजापूर) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी शिल्पा हिचे नातेवाईक असल्याचे सांगत शनिवारी सायंकाळी श्रीकांत किन्हाळकर, परशुराम वाघुळे, विठ्ठल शिंदे आणि त्यांच्यासोबत इतर दोन अनोळखी इसम असे पाच जण त्यांच्या घरी आले. त्यांनी 'आमच्या बहिणीच्या नादाला का लगतोस व बहिणीकडे कार आणि घर का मागतोस?' असे म्हणत डॉ. बोलधने यांना शिवीगाळ केली. यानंतर आलेल्या लोकांनी डॉ. बोलधने यांच्या गळ्यावर काठीने वार केला. तर परशुरामने धारदार शस्त्राने पाठीच्या उजव्या बाजूस मारहाण करून विठ्ठल शिंदे याने देखील पाठीवर मारहाण केली. मारहाणीनंतर त्यांनी बोलधने यांना जीवे मारण्याची धमकी देत घरातील साहित्याची तोडफोड करून मोबाइल व टीव्ही चोरून नेला. याप्रकरणी बोलधने यांच्या तक्रारीवरून सोमवारी शिऊर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Social Plugin