आता सणासुदीच्या पार्श्वभुमीवर खाद्य पदार्थांची विशेष तपासणी मोहिम !!


स्वतंत्र प्रयोगशाळेसाठी प्रस्ताव द्यावा- जिल्हाधिकारी स्वामी


छत्रपती संभाजीनगर

दिवाळीपर्यंत चार्तुमास व सणांचा काळ असल्याने तसेच या कालावधीत पावसाळा असल्याने अन्न व औषध प्रशासनाने बाजारात विक्री होणारे खाद्यपदार्थांची विशेष तपासणी मोहिम राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ता.११ रोजी एका बैठकीत दिले. तसेच जिल्ह्यासाठी स्वतंत्र अन्न औषध प्रशासन विभागाची अन्न व नमुने तपासणी प्रयोगशाळा तयार करण्याचा प्रस्ताव देण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.



बाजारात विक्री होणारे खाद्य- अन्न पदार्थ, विविध पेये, पाकीटबंद पदार्थ यांच्या तपासणीबाबत विशेष मोहिम राबविण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत. या बैठकीस सहा. आयुक्त अन्न व औषध प्रशासन  द.वि. पाटील, सहायक आयुक्त निखिल कुलकर्णी, अन्न सुरक्षा अधिकारी प्र.प. सुरसे, सु.त्रि. जाधवर वर्षा रोडे, एस.बी. तायडे, मो. फ. सिद्दीकी, पी.एस. अंजिठेकर उपस्थित होते. आगामी सण व उत्सवाच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मिठाई, फरसाण, सुका मेवा अशा अन्नपदार्थांची विक्री होत असते.  या काळात मागणी जादा असल्याने भेसळीची शक्यता वाढते. अशावेळी  घातक घटकांनीयुक्त मिठाईपासून नागरिकांचे रक्षण करणे आवश्यक आहे. नागरिकांना सुरक्षित सकस व निर्भेळ अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून  विशेष मोहिम राबविण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.  या तपासणीत  मिठाईचे उत्पादन करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या दुकानांची कसून तपासणी करून उत्पादनासाठी वापरण्यात येणारे दुध, खवा, मावा, तूप, साखर, मैदा, आणि इतर घटकांची तपासणी करण्यात येणार आहे. भेसळयुक्त घटकांचा शोध अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६ च्या मार्गदर्शक तत्वानुसार, मिठाईमध्ये वापरण्यात येणारे घटक जसे की खवा मावा, आणि तूप हे भेसळयुक्त आहेत किंवा नाही याची खात्री करण्यात येणार आहे.


अन्न व औषधी प्रशासन विभाग आता तरी कार्यक्षेत्र वाढवून कारवाया करणार का ? 


जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या बैठकीत अन्न व औषधी प्रशासनाला सणासुदीच्या काळात खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्याचे निर्देश दिलेत खरे. मात्र बऱ्याच दुकानात मिठाई निर्मीती (Manufucture) व वैध मुदत (Expiry) याबाबत काहीच माहिती दर्शविलेली नसते. तर बहुतेक दुकानात कालबाह्य खाद्यपदार्थ सर्रास विक्री होताना आढळून येतात. मात्र सद्यस्थितीत तरी या दुकानावर कोणताही विभाग कुठलीही कारवाई करताना दिसत नाही. परंतु आजच्या या बैठकीनंतर अन्न व औषधी प्रशासन जिल्ह्यात यापुढील काळात आपले कार्यक्षेत्र वाढवून कारवाया आता तरी करणार का ? असा सवाल नागरिकांना पडला आहे.



नागरिकांनी मिठाई खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी.


मिठाई खरेदी करताना दुकानाची स्वच्छता आणि अन्न परवाना, असामान्य रंग, वास, किंवा चव असलेली मिठाई खरेदी करणे टाळा, परवानाधारक, नोंदणीधारक दुकानातूनच मिठाई खरेदी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी केले.