घायगाव शिवारातील घटना
वैजापूर
भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर त्याची आई गंभीर जखमी झाली. ही दुर्घटना सोमवारी (ता.११) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास गंगापूर रस्त्यावर घायगाव शिवारात घडली. सचिन सुखदेव वाहूळ (वय ४०) असे या घटनेतील मृताचे नाव असून त्यांची आई शेषबाई सुखदेव वाहूळ (वय ५५ ) यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. हे दोघेही येवला तालुक्यातील धामणगाव येथील राहणारे आहेत.
मृत सचिन वाहूळ हे नेवासा येथून काकाच्या अंत्यविधीहून त्यांच्या दुचाकीवरून (एमएच १५ डीआर ९१४३) घरी आईसोबत धामणगावला परतत होते. वैजापूरपासून पाच किमी अंतरावर घायगाव शिवारातील गट क्रमांक ९९ मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. या धडकेत दोघेही लांब फेकले गेले. यात सचिन जागीच ठार झाले तर शेषबाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्याठिकाणी नागरिक जमा झाले. नागरिकांनी टेम्पोचा पाठलाग करून समृद्धी महामार्गाजवळ टेम्पो अडवला. मात्र टेम्पो चालक तिथून फरार झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितले. यावेळी नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान शेषबाई यांना वैजापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारांनंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले. मयत सचिन यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
Social Plugin