गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याची 'हाथ की सफाई'

शहरातील आनंदनगर वसाहतीतील घटना

वैजापूर

शहरातील आनंदनगर वसाहतीत गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने एकाच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची चैन चोरून नेल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन राजपूत हे स्टेशन रोड लगत असलेल्या आनंदनगर वसाहतीत कुटुंबियांसह रहिवासास आहेत. दरम्यान ३१ जुलै रोजी  वसाहतीत सकाळी सात वाजेपासून एक धार्मिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात ते सपत्नीक सहभागी झाले होते. कार्यक्रमा दरम्यान त्यांचे सात ते आठ वेळा घरी येणे-जाणे झाले. सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास कार्यक्रम आटोपल्यानंतर राजपूत यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोन्याची चैन  चोरी गेल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.