विवाहपूर्व संवाद केंद्रांमुळे बळकट व्हावी कुटुंबसंस्था- जिल्हाधिकारी स्वामी
छत्रपती संभाजीनगर
विवाहपूर्व संवाद केंद्रात विवाह व विवाह पश्चात निर्माण होणाऱ्या विविध प्रश्नांबाबत पूर्व कल्पना देऊन संभाव्य वाद टाळले जातात. त्यातून वाद विकोपाला न जाता सामंजस्य निर्माण होऊन कुटुंबसंस्था बळकट होते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.
विवाहपूर्व संवाद केंद्र येत्या १५ तारखेपासून प्रत्येक तालुक्यात सुरु करण्यात येत आहेत. या संवाद केंद्रात विवाहेच्छुक जोडप्यांना संवाद साधुन माहिती देणाऱ्या संवाद तज्ज्ञांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण पार पडले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारि गणेश पुंगळे, तज्ज्ञ मार्गदर्शक ॲड. वैजनाथ काळे, संरक्षण अधिकारी हर्षल पाटील आदी तसेच प्रत्येक तालुक्यातून दोन या प्रमाणे १८ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, विवाहानंतर निर्माण होऊ शकणारे संभाव्य वाद पूर्वकल्पना असली की टाळता येतात. जोडप्यांमध्ये त्यासाठी सुसंवाद हवा. आपापसात सामंजस्य हवे. त्यासाठी महत्त्वाची भुमिका हे संवाद केंद्र बजावेल. त्यासाठी संबंधितांना हे प्रशिक्षण दिले जात आहे. तालुकास्तरावर हे केंद्र सुरु करणारा आपला पहिलाच जिल्हा आहे. त्यादृष्टीने आपल्या केंद्रावर येणाऱ्या विवाहेच्छु जोडप्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.
Social Plugin