तीन लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ

बाहेरख्याली पतीसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल


वैजापूर
गाडी खरेदी करण्यासाठी माहेरहुन तीन लाख रुपये आण असे म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या बाहेरख्याली पतीसह सासरच्या इतर लोकांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल तागड (पती), तुकाराम तागड (सासरा), अनुसया तागड (सासू), सुवर्णा पोटे (नणंद), राहुल पोटे (नंदाई) व अश्विनी डोळझाके (नातलग) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील पीडित महिलेचा वर्ष-२०१९ मध्ये सुनील तागड (रा.नगिनापिंपळगाव) याच्यासोबत विवाह पार पडला. दरम्यान विवाहिता सासरी नांदत असताना सासरचे लोक नणंद व नंदाई यांच्या सल्ल्याने तिचा किरकोळ कारणाहून छळ करून गाडी खरेदी करण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आण अशी मागणी करत. मात्र तिच्या माहेरच्या लोकांनी सासरच्याचा समज काढला. यानंतर पती सुनील याने विवाहितेला राजगुरूनगर (पुणे) येथे त्याच्यासोबत राहावयास घेऊन गेला. तिथे त्यांनी तिला दोन महिने बऱ्यापैकी नांदविले. परंतु त्यानंतरच्या काळात शेजारीच राहणारी त्यांची नातलग अश्विनी डोळझाके हिच्यासोबत सुनीलचे प्रेमसंबंध असल्याची भणक विवाहितेला लागली. तिने याबाबत तिला विचारणा केली असता अश्विनीने विवाहितेला चापट बुक्यांनी मारहाण केली. पतीचे इतर ठिकाणी संबंध असल्याचा प्रकार विवाहितेच्या लक्षात आला व यामुळेच पती आपल्याला नांदवत नसल्याचे तिला समजले. अखेर एके दिवशी सुनीलने तिला मारहाण करून माहेरहुन तीन लाख रुपये अशी मागणी करून घराबाहेर हाकलून दिले.