मुलगी ही आई-वडिलांना देवाने दिलेली एक अनमोल भेट : आमदार रमेश बोरनारे

वैजापूरात "कन्या सन्मान दिन" उत्साहात साजरा

वैजापूर 
मुलगी ही प्रत्येक आई-वडिलांना देवाने दिलेली एक अनमोल भेट आहे. आजचा दिवस हा प्रत्येक माता-पिता व मुलींसाठी विशेष आहे. समाजात मुलगा-मुलगी समानता प्रत्यक्षात यावी हा संदेश देत दरवर्षी "कन्या सन्मान दिन" साजरा केला जातो असे उदगार आमदार रमेश बोरनारे यांनी कन्या सन्मान दिनी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना काढले.


येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित या कार्यक्रमात आमदार रमेश बोरनारे, उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, के.डी.ढोकणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.एन, मोरे, तहसिलदार सुनील सावंत,गट विकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत आदींची उपस्थिती होती. 



यापुढे बोलताना आ.बोरनारे म्हणाले की, मुलीला आपल्या संस्कृतीत  लक्ष्मीचे रूप मानले जाते. 'पहिली बेटी धनाची पेटी' ही म्हण आजही आपल्याला मुलीच्या महत्त्वाची जाणीव करून देते असे सांगून मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी प्रशासकीय स्तराहून देखील अधिकची जनजागृती होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी आरोग्य विभाग, महिला बाल कल्याण विभाग, ग्रामविकास विभाग,पोलिस विभाग,नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने उपस्थितीत मुलींना एक-एक झाडांची रोपटे व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर आधारित  पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.