Vaijapur Doctor's News |वैजापूर होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन

निवेदनाद्वारे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्याची मागणी

वैजापूर 

वैजापूर होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेच्यावतीने  तहसीलदार सुनील सावंत यांना  सीसीएमपी कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांना एमएमसी (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल)मध्ये नोंदणी करण्यात यावी या आशयाचे ११ जुलै रोजी निवेदन देण्यात आले.


यावेळी संघटनेच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  महाराष्ट्र शासनाने सन-२०१४ मध्ये कायदा करून होमिओपॅथिक डॉक्टरांना रुग्णांवर ऍलोपॅथी उपचार करण्याची परवानगी देण्यात आली. त्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांना 'सीसीएमपी' हा एका वर्षाचा अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आला होता. ज्या डॉक्टरांनी हा अभ्यासक्रम (Course) पूर्ण केला त्यांना रुग्णांवर ऍलोपॅथी उपचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या अंतर्गत अनेक डॉक्टरांनी सी.सी.एम.पी. हा कोर्स केला आहे. त्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यामध्ये नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने परवानगी देखील दिली. परंतु याबाबत आय.एम.ए.ने (Indian Medical Assocition) विरोध करत होमिओपॅथिक डॉक्टरांचा एम.एम.सी.(महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) 
मध्ये नोंदणी  करू नये यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. तरी लवकरात लवकर बी.एच.एम.एस. (सीसीएमपी) डॉक्टर यांचे एम.एम.सी.(महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) मध्ये नोंदणी करण्यात यावी. यासाठी वैजापूर होमिओपॅथी डॉक्टर संघटनेच्यावतीने तहसिलदार सुनील सावंत यांना हे निवेदन देण्यात आले. सदरील निवेदन मुख्यमंत्री तसेच वैद्यकीय मंत्री व इतर विभागांपर्यंत वर्ग करण्यात यावे अशी मागणी संघटनेच्यावतीने यावेळी करण्यात आली. वैजापूर होमिओपॅथी संघटनेचे डॉ.दिनेश राजपूत,डॉ.राजीव मतसागर,डॉ.योगेश राजपूत, डॉ.संदीप मस्के, डॉ.पंकज संचेती, डॉ.राजीव जगधने, डॉ.उद्धव सोनवणे, डॉ.बी.बी. शिंदे, डॉ.बाबा इंगळे,डॉ.महेश साठे, डॉ.नितीन अग्रवाल, डॉ.अश्विन जोशी, डॉ.सुधाकर मापारी यांच्यासह डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.