Social News : वैजापूरात मंत्री शिरसाटांची एंट्री अन्........

समर्थकांची गर्दी, ट्रॅफिक जाम...

वैजापूर
सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  संजय शिरसाट यांचा ताफा अचानक येऊन थांबतो.  'अन् एक प्याली चाय' साठी ते वाहनातून खाली उतरतात. मात्र तितक्यातच परिसरात काही वेळा करिता ट्रॅफिक जाम (वाहतूक कोंडी) होते. हे चित्र होते सोमवारी दुपारी वैजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील. 


        त्याचे झाले असे की, सोमवार म्हणजे वैजापूर शहरातील आठवडी बाजाराचा दिवस त्यातच २० जुलै रोजी दुपारी एक वाजता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा ताफा छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात होता. दरम्यान त्यांचा ताफा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावरच अचानक थबकला. इतक्यात मंत्री शिरसाट यांची काही समर्थक त्यांच्या भेटीसाठी त्याठिकाणी आले. त्यातच एकाने मंत्री महोदयांना चहा पिण्यासाठी 'प्रपोज' मारला. त्यामुळे शिरसाट यांना देखील 'एक प्याली चाय' चा मोह आवरला नाही व ते वाहनातून खाली उतरले.


 
वाहनातून बाहेर पडताच शिरसाट यांनी हॉटेलवाल्याला 'ये भैय्या जल्दी चाय बना रे' असे म्हटले. हॉटेलवाल्या भैय्याने देखील यावेळी 'स्पेशल चहा' बनविण्यास सुरुवात केली.  समर्थकांनीही हा 'सुवर्ण योग' साधत मंत्री महोदयांसोबत रस्त्याच्या कडेला फोटो सेशन उरकण्यास सुरुवात केली. मात्र या सर्व घटनाक्रमा दरम्यान अगोदरच वर्दळीचे ठिकाण असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक कोंडी होऊन वाहनं संथगतीने पुढे सरकत होती. काही वेळा नंतर मंत्री महोदयांचे चहापान उरकताच त्यांचा ताफा छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पुढील प्रवासासाठी निघाला. दरम्यान हा सर्व प्रकार परिसरातील नागरिकांनी 'याची देही याची डोळा' अनुभवला. यातच काही वाहनचालकांनी 'आम्ही जर रस्त्यावर अशी वाहनं उभी केली असती तर पोलिस प्रशासनाने आम्हाला कितीची पावती फाडली असती ? असा सवाल उपस्थित केला.