वैजापूर येथील शिवमहापुराण कथेत लाखो भाविकांची उपस्थिती
'कन्यादाना पेक्षाही श्रेष्ठ विद्यादान आहे' त्यामुळे आई-वडिलांनी आपल्या मुलीना चांगल्या संगोपनासह उत्तम शिक्षण द्यावे मात्र पाल्यानींही शिक्षणा दरम्यान आपली बुद्धी इतर मार्गात वळवू नये असे प्रबोधन शिव कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी वैजापूर येथे सुरू असलेल्या 'श्री शिवमहापुराण कथे'च्या सहाव्या दिवशी भाविकांना केले.
शहरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या नागपूर-मुंबई महामार्गलगत पंडित प्रदीप मिश्रा यांच्या वाणीतून सुरू असलेल्या 'श्री शिवमहापुराण' कथेचा मागील सहा दिवसांपासून लाखो भाविकांनी या कथा श्रवणाचा लाभ घेतला. दरम्यान 'कन्यादाना पेक्षाही श्रेष्ठ दान हे विद्यादान आहे' त्यामुळे मुलींना उत्तम शिक्षण द्या असे त्यांनी आपल्या कथेच्या माध्यमातून भाविकांचे प्रबोधन केले. याशिवाय गृहस्थ आश्रमात असले तरी शिवाचे नाव स्मरण करा, तर शिवालिंगावर एक बेलपत्र वाहण्याने मोठे पुण्य लाभते असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान सध्या कलीयुगाचा काळ सुरू आहे त्यामुळे कुणाशी वाद करत बसू नका कारण ज्ञानी अथवा अज्ञानी माणसाला समजविणे सोपे आहे. मात्र अभिमानाने भरलेल्या लोकांना समजविणे कठीण आहे. त्यामुळे एखाद्याने 'हत्ती उडतो' असे सांगितले तर तुम्ही त्याला होच म्हणा विनाकारण वादात वेळ न घालता तोच वेळ अध्यात्मात द्या असेही त्यांनी कथे दरम्यान सांगितले. कथेच्या मागील सहा दिवसाच्या काळात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, मंत्री संजय शिरसाट,आमदार रमेश बोरनारे, आमदार प्रशांत बंब, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, डॉ राजीव डोंगरे, शेख अकिल यांच्यासह अनेक मान्यवरांनी कथा श्रवणाचा लाभ घेतला. आयोजक विशाल संचेती यांच्यासह जीवनलाल संचेती बाळासाहेब संचेती, डॉ दिनेश परदेशी, शिल्पा परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पारस घाटे, प्रेम राजपूत, पंकज ठोंबरे, निलेश पारख, विनोद राजपूत, दिनेश राजपूत, सोनू राजपूत यांच्यासह पाचशे पेक्षा अधिक स्वयं सेवकांनी कथास्थळी भाविकांना सेवा दिल्या.
Social Plugin