Crime News : भरदिवसा चोरट्यांची हाथ की सफाई

चोरट्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

वैजापूर

तालुक्यातील भायगाव गंगा येथे भरदिवसा चोरट्याने घरफोडी करून ७४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. दुपारी घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी ही 'हाथ की सफाई' केली. याप्रकरणी पोलिसांत चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भायगाव गंगा येथील रहिवासी कांतीलाल विठ्ठल कदम हे २७ जून रोजी कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी दुपारच्या सुमारास घरी कुणीच नसताना चोरट्याने घराच्या मागील बाजूस असलेल्या दरवाजातून आत प्रवेश केला. त्यानंतर तेथील कपाट तोडून दोन सोन्याच्या पोत, दोन सोन्याच्या नथ, चांदीचे जोडवे ५ हजारांची रोकड असा एकूण ७४ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. चोरीची घटना घरातील सदस्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने शिऊर पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार गणेश गोरक्ष हे करीत आहेत.