कापसापेक्षा मका लागवडीला शेतकऱ्यांचे प्राधान्य
वैजापूर
वैजापूर तालुक्यात यंदा मृग नक्षत्राच्या पावसाने बहुतांश ठिकाणी वेळेवर दमदार सलामी दिल्याने तालुक्यात खरिपाची आतापर्यंत १०६.६९ टक्के इतक्या क्षेत्रावर पेरण्या पार पडल्या आहेत. आगामी दिवसात खरिपाच्या ११५ टक्क्यांपर्यँत पेरण्या पूर्णतः पार पडतील. असा अंदाज कृषी विभागाच्यावतीने वर्तविण्यात येत आहे. कृषी विभागाकडून खरिपाचा टक्का वाढल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान मागील वर्षांपेक्षा यंदा तालुक्यात मकाच्या पेरणी क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे.
तालुक्यात १ लाख ३६ हजार ७०४ हेक्टर इतक्या पेरणी योग्य क्षेत्रापैकी १ लाख ४५ हजार ८५६ हेक्टर इतक्या क्षेत्रावर खरिपाची पेरणी पार पडली असून अंतर पिकांचा देखील समावेश आहे. मागील वर्षी बहुतांश ठिकाणी पावसाने लहरीपणा दाखवला होता. यामुळे जवळपास काहीशा उशिराने खरिपाच्या पेरण्या पार पडल्या होत्या. पावसानेही आपला लहरीपणा कायम राखत शासकीय दप्तरी कोरम पूर्ण केला. परंतु पावसाच्या लहरीपणाचा फटका पिकांना मोठ्या प्रमाणात बसला होता. दरम्यान मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पावसाने तालुक्यात वेळेवर हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांसाठी आशादायक चित्र निर्माण झाले आहे. जून अखेर तालुक्यात खरिपाच्या एकूण पेरणीयोग्य क्षेत्रापैकी १०६ टक्के इतक्या क्षेत्रावर खरिपाची पेरणी पार पडली आहे. यंदा तालुक्यात शेतकऱ्यांनी मका पेरणीला सर्वाधिक प्राधान्य दिल्याने ८५ हजार ५६० हेक्टर इतक्या क्षेत्रावर मका तर त्याखालोखाल ४५ हजार १९३ हेक्टर इतक्या क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केली आहे. दरम्यान सोयाबीन ३ हजार ५८१ हेक्टर, मूग ३ हजार ४३८ हेक्टर, भुईमूग २ हजार ५६३ हेक्टर, तूर २ हजार ४८१ हेक्टर, बाजरी २ हजार ६३ हेक्टर, उडीद १५० हेक्टर, ऊस ८२६ हेक्टर इतक्या क्षेत्रावर खरिपाची पेरणी पार पडली आहे.
कापसाचा खर्च वाढला....
कापूस लागवडी पासून ते वेचणी दरम्यान लागणारा खर्च व भावाची घसरण पाहता यंदा शेतकऱ्यांनी कापसापेक्षा मका लागवडीला प्राधान्य दिले आहे. दरवर्षी तालुक्यात सरासरी ६८ हजार इतक्या क्षेत्रावर लागवड होणाऱ्या कापसाचे क्षेत्र यंदा कमी झाले असून ४५ हजार १९३ हेक्टर इतक्याच क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे तर दरवर्षी सरासरी ४८ हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर लागवड होणाऱ्या मका पिकाची यावर्षी ८५ हजार ५६० हेक्टर इतक्या क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.
लष्करी अळीपासून मका वाचवा...
"यंदा खरिपाची ११५ ते १२० टक्क्यांपर्यंत क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे. दरम्यान कापसाचे क्षेत्र कमी झाले असून मकाचे क्षेत्रात १७८ टक्क्याने वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आत्तापासूनच काळजी घेतली पाहिजे."
व्यंकट ठक्के, तालुका कृषीधिकरी, वैजापूर
Social Plugin