तालुक्यातील आलापूरवाडी येथील घटना : पोलिसांत गुन्हा दाखल
वैजापूर
वैजापूर तालुक्यातील आलापुरवाडी शिवारात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून ७२ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना ०७ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान चोरीच्या या घटनेनंतर मंगळवारी सायंकाळी शिऊर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धनंजय बाळकृष्ण काळे (वय ३७, रा.काळे वस्ती आलापूरवाडी) हे सोमवारी दुपारी शेतीकामासाठी गेले होते. शेतात जाताना त्यांनी घराला कुलूप लावले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यानी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी त्यांनी घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे नेकलेस, पोत, झुब्बे, नथ, वेल, चांदीची पैंजण, कमरपट्टा तसेच १० हजारांची रोकड असा एकूण ७२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना लक्षात येताच धनंजय यांनी चोरट्यांचा दुचाकीने तीन किलोमीटरपर्यँत माग घेतला. मात्र चोरट्यांनी पाठलाग करणाऱ्या गाडीवर स्क्रू ड्रायव्हर फेकून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला व ते पसार झाले. या घटनेनंतर सहायक पोलिस निरीक्षक वैभव रणखांब, हवालदार किशोर आघाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, अंगुली तज्ञ पथक (फिंगरप्रिंट तज्ज्ञ) व श्वान पथक घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मात्र काही ठोस पुरावे मिळू शकले नाहीत. याप्रकरणी तीन अनोळखी इसमांविरुद्ध पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास किशोर आघाडे करीत आहेत. एकंदरित भरदिवसा घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Social Plugin