चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
वैजापूर
ट्रकमधून प्राण्यांचे मांसाचे तुकडे व चारवट वाहतूक करणाऱ्या एकाविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख साकीर शेख रहेमान (वय - ३०, रा. मालेगाव, जि.नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव असून तालुक्यातील शिऊर बंगला ते नांदगाव रोडवर नागवाडी फाटा येथे पोलिसांनी १ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिऊर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ट्रकने (एमएच १५ बीजे ७८६०) प्राण्यांच्या मांसाचे तुकडे व चारवट वाहतूक होत असल्याची माहिती शिऊर पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. मंगळवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास नांदगाव रोडलगत असलेल्या नागवाडी फाटा येथे पोलिसांनी माहितीतील वाहन अडवले. यावेळी चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख साकीर शेख रहेमान (रा.मालेगाव) असे असल्याचे सांगितले. मात्र वाहनातील मालाबाबत तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात सुमारे ५ टन प्राण्यांचे मांसाचे अवयव व चारवट मिळून आले. कारवाई दरम्यान पोलिसांनी वाहन जप्त केले असून शिऊर पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Social Plugin