Crime News - अखेर कीर्तनकार संगीता (ताई) पवार यांच्या खुनाचे गूढ उकलेले....

दोघे मारेकरी पोलिसांच्या गळाला

वैजापूर
तालुक्यातील चिंचडगाव शिवारात सदगुरु नारायणगिरी आश्रम येथील मोहटा देवी माता मंदिरात चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोघा चोरटयांनीच कीर्तनकार संगीता (ताई) पवार यांची डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे उघड झाले आहे. गुन्ह्यातील दोन्ही आरोपी हे परप्रांतीय असून पोलिसांनी एकाला मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरून तर एकास तालुक्यातील महालगाव येथून ताब्यात घेतले. संतोष उर्फ भायला जगण चौहान  ( रा.अंछली ता. सेंधवा जि. बडवाणी राज्य मध्यप्रदेश ह. मु. गाढेपिंपळगाव ता.वैजापूर) व अनिल उर्फ हाबडा नारायण विलाला (रा. अंछली ता. सेंधवा जिल्हा बडवाणी राज्य मध्यप्रदेश) असे दोन्ही मारेकऱ्यांची नावे आहेत.


      याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री चिंचडगाव शिवारात सदगुरु नारायणगिरी आश्रम येथील मोहटा देवी माता मंदिर परिसरात महिला कीर्तनकार संगीता (ताई) पवार यांची अज्ञाताने डोक्यात दगड घालून हत्या केली. या घटने दरम्यान मारेकऱ्यांनी मंदिरातील दानपेटी व काही मुर्त्या देखील चोरल्या. घटना समजताच मारेकऱ्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी  वेगवेगळी पथके तयार केली.


 गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना घटनेतील एक संशयीत (वर्णनावरून) मिळता जुळता दिसणारा इसम हा महालगाव शिवारात फिरत असल्याचे पोलिसांना समजले. त्याठिकाणी जाऊन पोलिसांनी त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव संतोष उर्फ भायला जगण चौहान असे असल्याचे सांगत तो मध्यप्रदेश राज्यातील रहिवासी असून सध्या मजुरी करण्यासाठी मागील वर्षभरापासून तालुक्यातील गाढेपिंपळगाव येथे रहिवासास असल्याचे पोलिसांना त्याने सांगितले. त्याला पोलिसांनी खुनाबद्दल चौकशी केली असता सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच सदर गुन्हा आपण  अनिल उर्फ हाबडा नारायण विलाला याच्यासोबत मिळून केला असल्याची कबुली दिली. परंतु अनिल हा गावाकडे पळून गेल्याचे पोलिसांना समजले. लगेचच पोलिसांच्या एका पथकाने अनिल याला मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या शिरपूर येथून ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात दोघा मारेकऱ्यांनी चोरीच्या उद्देशानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार  राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधीकारी भागवत फुंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सपोनि शंकर वाघमोडे (प्रभारी अधिकारी विरगांव), स्थागुशा पथकाचे सपोनि संतोष मिसळे, सपोनि पवन इंगळे, सपोनि सुधीर मोठे, पोह, वाल्मीक निकम, विठठल डोके, शिवानंद बनगे, अशोक वाघ, गोपाळ पाटील, महेश बिरुटे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, चालक संजय तांदळे, निलेश कुडे तसेच, पोह विजय ब्राम्हदे, गणेश पंडुरे, रावते, अभंग, चालक जिरे आदींच्या पथकाने पार पाडली.