तालुक्यातील हाजीपुरवाडी येथील घटना : पोलिसांत गुन्हा दाखल
वैजापूर
पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून टाकलेले काटे काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून शेतकऱ्याला लोखंडी गजाने जबर मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना तालुक्यातील हाजीपुरवाडी येथे घडली. याप्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोपट कारभारी महेर (३५) हे हाजीपुरवाडी येथील रहिवासी असून शेती कसून उपजीविका करतात. दरम्यान पोपट महेर यांनी त्यांच्या शेतात पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून काटे टाकले होते. परंतु भरत कारभारी महेर याने ते काटे काढले. त्यामुळे ०९ जुलै रोजी सकाळी पोपट महेर यांनी त्यास याबाबत जाब विचारला असता, भरतने त्यांना शिवीगाळ करून हातातील लोखंडी गजाने पोपट महेर यांच्या डाव्या पायाच्या पोटरीवर आणि पाठीवर जबर मारहाण केली. त्याच वेळी भरतची पत्नी हिमलाबाई हिने देखील पोपट यांना शिवीगाळ करत चापटबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी १४ जुलै पोपट महेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार किशोर आघाडे करित आहेत.
Social Plugin