वैजापूर
वैजापूर नगर परिषदेत मोठा बदल झाला असून मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांची अचानक बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी भागवत बिघोत यांनी बुधवार (ता.२५) रोजी नवे मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.
संगीता नांदुरकर यांनी काही महिन्यांपूर्वीच वैजापूर नगरपालिकेचा पदभार स्वीकारला होता. मात्र त्यांच्या कार्यकाळात शहरातील स्वच्छता व्यवस्थेबाबत सातत्याने वाद निर्माण झाले. शहरातील स्वच्छतेची ढासळलेली अवस्था, कचरा संकलन व व्यवस्थापन यामध्ये आलेली अनियमितता आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारी यामुळे त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला.
स्वच्छतेसंबंधी वाढत्या तक्रारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या नाराजीमुळे नांदुरकर यांची बदली झाल्याचे सर्वत्र चर्चा सुरू आहे. मागील आठ महिन्यांपासून वादातीत ठरलेल्या नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांची बदली होताच शहरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
नवनियुक्त मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी बुधवारी पुन्हा एकदा नव्याने पदभार स्वीकारला. दरम्यान बिघोत यांच्या मागील काळात स्वच्छतेचे अनेक परितोषिक पटकविणाऱ्या वैजापूर नगरपालिका हद्दीत आठ महिन्यांपासून घाणीचे साम्राज्य वाढले होते. यामुळे संपूर्ण शहराला बकाल अवस्था आले होती. याशिवाय रोज सकाळी घरापुढे येणारी घंटागाडी देखील बंद झाली.
या सर्व बाबीला तत्कालीन पालिका प्रशासक नांदूरकर यांनी स्वच्छतेसाठीचे टेंडर झाले नाही असा एकच नारा दिला. याशिवाय नगरपालिकेत येणाऱ्या अभ्यंगताना उर्मट वागणूक देणे तर कर्मचाऱ्यांना देखील आवर्च्य भाषा वापरणे या येनकेन कारणांमुळे तत्कालीन मुख्याधिकारी नांदूरकर चांगल्याच चर्चेत राहिल्या.
बुधवारी नवनियुक्त मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी पदभार स्वीकारताच त्यांनी पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन स्वच्छता, पाणीपुरवठा आणि मुलभूत सुविधा यावर प्राधान्याने काम करण्याचे निर्देश दिलेत. बिघोत यांच्याकडून शहरवासियांना प्रशासनाच्या कार्यपद्धतीत सकारात्मक बदलाची अपेक्षा आहे. बुधवारी मुख्याधिकारी बिघोत यांचे शहरात आगमन होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
Social Plugin