वैजापूर
तालुक्यातील शिऊर (बं) परिसरात दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी वृद्धेला चोरटे आल्याची बतावणी करून तिच्या गळ्यातील ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडुबाई राऊत (वय ६५) या तालुक्यातील शिऊर (बं) येथील रहिवासी आहेत. शुक्रवारी सकाळी त्या घरासमोरील अंगणात झाडझुड करून रांगोळी काढत होत्या. नेमके याच वेळी दोन अनोळखी इसम त्यांच्या जवळ आले. त्यांनी महिलेला एका दुकानाबाबत चौकशी करत 'ती दुकान कुठे आहे ?' अशी विचारणा करत “त्या दुकानावर चोरी झाली असून तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी कागदात बांधून देतो” असे सांगून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे डोरले व मनीमंगळसूत्र काढून कागदात बांधल्याचे भासवले. त्यानंतर ती पुडी त्यांनी महिलेच्या लुगड्याच्या पदराला गाठ मारून दिली. मात्र काही वेळाने कडूबाई यांनी पुडी उघडून तपासली असता त्यामध्ये दागिने नसून दगडं असल्याची बाब त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात भामट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Social Plugin