गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विद्यार्थ्यांना परिपूर्ण करणे ध्येय- प्राचार्य डॉ. थोरे



वैजापूर 
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे विनायकराव पाटील महाविद्यालय हे ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची हमी देणारे महाविद्यालय असून सध्याच्या परिस्थितीशी सुसंगत ज्ञान देऊन त्याला परिपूर्ण बनविणे हेच आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. शिवाजी थोरे यांनी  केले. ते विनायकराव पाटील महाविद्यालय व महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ता.१३ जानेवारी रोजी आयोजित शिक्षक पालक मेळाव्या प्रसंगी बोलत होते. या प्रसंगी  प्रमुख पाहुणे आप्पासाहेब पाटील तसेच  महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी धुळे महानगरपालिका उपायुक्त सचिन गायकवाड, माजी विद्यार्थी ॲड.सचिन जानेफळकर, महाविद्यालय विकास समिती सदस्य ॲड.देवदत्त पवार, रावसाहेब जगताप, प्रभाकर बारसे, जवाहर कोठारी यांची उपस्थिती होती. आपल्या मनोगतात डॉ. थोरे पुढे म्हणाले  कि, महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या मुलांची पर्यायाने महाविद्यालयाची यशस्वी घोडदौड तसेच शैक्षणिक प्रगतीची जाणीव व्हावी यासाठी हा शिक्षक पालक मेळावा आयोजित करण्याचा उद्देश असल्याचे सांगून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांनीही जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. याशिवाय आप्पासाहेब पाटील यांनी  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले तर प्रमुख पाहुणे सचिन गायकवाड यांनीही  आपल्या यशात विनायकराव पाटील महाविद्यालयाची भूमिका निर्णायक असल्याचे सांगून शिक्षकाप्रती आदरभाव हेच आपल्या यशाचे गमक असल्याचे सांगितले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेल, देवगिरी पोलिस डिफेन्स ॲकेडमी यांनी आपापल्या विभागाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संदीप परदेशी यांनी तर सूत्रसंचालन डॉ. भीमराव जाधव यांनी केले. उपस्थितांचेभार डॉ. किशोर भोलाने यांनी मानले. याप्रसंगी  महाविद्यालयातील  प्राध्यापक, प्राध्यापकत्तेर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.