वैजापूर
वैजापूर येथील नगर परिषद निवडणुकीच्या मतपेट्यांची सुरक्षितता आणि मतमोजणी प्रक्रियेबाबत तयारी यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मतपेट्यांच्या स्ट्राँगरूमची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी प्रशासन, पोलिस यंत्रणा व निवडणूक कर्मचाऱ्यांना मतमोजणीच्या दिवशी कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. मतमोजणी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, सुरळीत आणि कायद्याच्या चौकटीत पार पाडावी असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी त्यांच्या या भेटी दरम्यान दिले. स्ट्राँगरूमची सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवेश-नियंत्रण तसेच कर्मचारी तैनातीची तपासणी केली. मतमोजणीदरम्यान प्रत्येक टेबलवरील कामकाज ऑन-कॅमेरा रेकॉर्ड करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहणार आहे. याशिवाय माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याचे निर्देश देण्यात आले. मतमोजणीदरम्यान कोणत्याही उमेदवार किंवा प्रतिनिधींनी आक्षेप नोंदविल्यास ते शांततेत, नियमांनुसार आणि तत्काळ सोडवावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, वैजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत, तहसिलदार सुनील सावंत हे उपस्थितीत होते.


.jpg)
Social Plugin