श्री विसर्जन मिरवणूक मार्गावर वैजापूर पोलिसांचा शांतता पंचनामा

नियमांची पायामल्ली करणाऱ्यांविरुद्ध दाखल होणार गुन्हे !!

वैजापूर

यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यासह शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनाच्यावतीने कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून  ता.०५ रोजी वैजापूर पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर 'शांतता पंचनामा' केला. 


'श्री' विसर्जन मिरवणूक मार्गावर शांतता पंचनामा करताना पथक

'श्री' स्थापनेच्या दिवशी डॉल्बी साऊंड सिस्टीममुळे शहरातील एका सात वर्षीय मुलीचा कानाच्या पडद्याला गंभीर ईजा झाली. याची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे व पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी गणेश मंडळाच्या बैठकीत 'श्री' विसर्जन पारंपरिक वाद्यासह शांततेत पार पाडा असे आवाहन मंडळांना केले होते. या पार्श्वभूमीवर श्री' विसर्जनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे, गोपनीय शाखेचे ज्ञानेश्वर मेटे, नवनाथ निकम आदींच्या पथकाने विसर्जन मिरवणूक मार्गावर तब्बल दहा ठिकाणी 'शांतता पंचनामा' केला. पथकाने 'ध्वनी मापक' यंत्राद्वारे हा पंचनामा पार पाडला.  पंचनाम्या दरम्यान मिरवणूक मार्गावर ११० ते १५० डिसीबील पर्यंत उचांकी आवाजाची नोंद घेण्यात आली. पंचनामा करताना प्राप्त व विसर्जन मिरवणुकी दरम्यान निर्माण होणाऱ्या आवाजाचे तुलनात्मक मापन होणार असून पोलिस प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायामल्ली करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा यावेळी पोलिसांनी दिला आहे.