आमदार रमेश बोरनारे ठोकणार लवकरच आणखीन एक षटकार !!
वैजापूर
कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी घेतलेल्या १० एकर जागेची डेव्हलपमेंट कधी करणार ? असा सवाल संचालक मंडळाला करून कांद्याचा भाव वाढवून द्या. अशी मागणी देखील आपण राज्यशासनाकडे केली असल्याचे आमदार रमेश बोरनारे यांनी सांगितले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शहरानजीकच्या कांदा मार्केटमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. सभापती रामहरी जाधव, माजी उपनगराध्यक्ष साबेर खान, अकिल शेख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, संजय बोरनारे, माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, कल्याण दांगोडे, बाजार समितीचे संचालक रियाज शेख, प्रशांत त्रिभुवन आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. आमदार बोरनारे बोलताना पुढे म्हणाले की, बाजार समिती ही कुणा एका पक्षाची नसून हा शेतकऱ्यांच्या विकासाचा पाया आहे तर यंदा वैजापूर तालुक्यात मका लागवडीचे क्षेत्र वाढले असल्याने बाजार समितीने सर्वांपेक्षा पुढे जाऊन मक्क्याला भाव द्यावा. अशा सूचना देखील त्यांनी केल्या. याशिवाय एका कांदा व्यापाऱ्याने चारशे शेतकऱ्यांची दोन कोटी रुपयांची फसवणूक केली. मात्र बाजार समितीने शेतकऱ्यांना ५० टक्के रक्कम व्यापाऱ्यांकडून जमा होणाऱ्या सेजमधून दिली. राज्यात असा निर्णय घेणारी वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही पहिलीच ठरल्याचे ते म्हणाले. याशिवाय तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकदा वखार महामंडळाला भेट द्यावी. येथे शेतीमालाची प्रतवारी व वर्गीकरण कशाप्रकारे केली जाते? याचा देखील शेतकऱ्यांनी अभ्यास करावा. असे आवाहन त्यांनी केले. बाजार समितीत वेगवेगळ्या पक्षाचे १८ संचालक आहेत. परंतु बाजार समिती आपले कुटुंब समजून सर्वांनी राजकारण न करता शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावे. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
अन् वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत..
दरम्यान सभेला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्या सर्वांच्या नावाचा उल्लेख करून आ. बोरनारे यांनी सर्वांनाच अगदी शांत केले. त्यामुळे नेहमीच विविध कारणाने गाजणारी बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा यंदा मात्र आमदार रमेश बोरनारे यांच्या अध्यक्षतेखाली अगदीच शांततेत पार पडली.
औद्योगिक वसाहत अन् षटकार..
आमदार बोरनारे म्हणाले की, रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेतून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे काम करून मी षटकार ठोकला आहे. परंतु आता वैजापूर तालुक्यात प्रलंबित असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मी आज मुंबईला जात आहे. या प्रश्नावर लवकरच तोडगा निघणार असून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक करण्याची माझी इच्छा आहे. हे काम पूर्णत्वास नेऊन मी आता लवकरच पुन्हा एक षटकार ठोकणार आहे.

Social Plugin