घरफोड्या कडून एक लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त
वैजापूर
तालुक्यातील भायगाव गंगा येथे भरदिवसा घरफोडी करून ७४ हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्याच्या छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १८ जुलै रोजी मुसक्या आवळल्या. अजव्या महादु भोसले (२८) रा. अंतापुर गायरान वस्ती, ता.गंगापूर असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या घरफोड्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांतीलाल विठ्ठल कदम हे वैजापूर तालुक्यातील भायगाव गंगा शिवारातील शेतगट क्रमांक ४ मधील शेतात रहिवसास आहेत. दरम्यान २७ जून रोजी ते व घरातील इतर सदस्य घरी नसताना घराच्या पाठीमागील दरवाजाची कडी-कोंडा तोडून चोरट्याने कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ७४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
नमुद घटना पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी अत्यंत गांभिर्याने घेऊन सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सुपूर्द केला. घरफोडीचे ठिकाण हे अत्यंत कमी लोकवस्तीचे असल्याने दुपारच्या वेळेस तेथे अत्यंत कमी नागरिकाची वर्दळ त्यातही घरफोडी झाली तो परिसर दुपारी व रात्री निर्मनुष्य असल्याने तसेच घटनास्थळी चोरीबाबत आरोपीचा कोणताही सुगावा देणारी खुन पोलिसांना मिळून आली नाही. यामुळे सदर गुन्हयाचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. यादरम्यान गुन्हयाचे अनुषंगाने गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे नमुद गुन्हा हा आजव्या महादु भोसले यांने केल्याचे स्थागुशाच्या पथकाला माहिती मिळाली. या आधारे पथक त्याचा शोध घेत असतांना १८ जुलै रोजी आजव्या भोसले हा भेंडाळा फाटा कडून गंगापूरच्या दिशेने जाणार असल्याबाबत खात्रीलायक बातमी पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला. मध्यरात्री साडे बारा वाजेच्या सुमारास अजव्या हा त्याचे मोटरसायकलवर जात असतांना पथकाने सावधगिरीने त्याला ताब्यात घेतले. गुन्हयाचे अनुषंगाने त्यास विचारपुस केली असता त्याने पोलिसांना अगोदर उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्याचेवर संशय बळावल्याने पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यानेच केला असल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी त्याला अटक करून भायगाव गंगा येथील कांतीलाल कदम यांच्या घरातुन चोरी केलेले दागिने व रोख रक्कम, व गुन्हयात वापरलेली मोटरसायकल असा एकुण १ लाख २२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत, स.पो.नि. सुधीर मोटे, दिपक पारणे, श्रीमंत भालेराव, कासिम शेख, प्रमोद पाटील, सचिन राठोड, योगेश तरमळे, जिवन घोलप, शिवाजी मगर, यांनी केली.
Social Plugin