तिच्या 'त्या'मागणीला कंटाळून त्याने केला तिचा खून...


दौलताबाद घाटात मिळून आला 'तिचा' मृतदेह

वैजापूर

एक लाखाची मागणी केल्याचे कारणाहून झालेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीचा खून करून तिचा मृतदेह घाटात फेकल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे. दरम्यान या घटने नंतर त्याने शिऊर पोलिस ठाण्यात शुक्रवारी सकाळी आत्मसमर्पण करून पोलिसांसमोर खुनाची कबुली दिली. दिपाली गणेश आस्वार (१९, रा.माळीवाडा, ता. कन्नड) असे घटनेतील मृत महिलेचे नाव असून सुनील सुरेश खंडागळे (२१, रा.मांडकी ता.वैजापूर) असे मारेकऱ्याचे नाव आहे. 

   
मृत : दिपाली आस्वार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवतीचे नाव दिपाली गणेश आस्वार (वय १९, रा. माळीवाडा, ता. कन्नड) असे आहे. ती कन्नड येथे आपल्या बहिणीकडे वास्तव्यास होती. गेल्या काही महिन्यांपासून तिचे वैजापूर तालुक्यातील मांडकी  येथील सुनील सुरेश खंडागळे  या तरुणाशी प्रेमसंबंध होते. दरम्यान गुरुवारी सुनील त्याच्या वडिलांची मोटरसायकल घेऊन कन्नडला पोहचला. तिथे तो दिपाली आस्वारला भेटला. त्यानंतर ते दोघे दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होते. रात्री दौलताबाद घाटा पोहचताच त्यांच्यात जोरदार वाद झाला.  हा वाद दिपालीने माझ्याकडे एक लाख रुपयांची मागणी केल्याने व आपण रक्कम न दिल्यास ती माझ्याविरुद्ध पोलिसांत अत्याचाराचा केल्याचा गुन्हा दाखल करेन यावरून झाल्याचे सुनीलने पोलिसांना सांगितले. यामुळे संतप्त होऊन सुनीलने दौलताबाद घाटात एका ठिकाणी दिपालीचे डोके दगडावर आपटून तिचा  खून केला व तिचा मृतदेह घाटात ढकलून दिला.

                                सुनील खंडागळे

 या घटनेनंतर आपल्या हातून भयानक कृत्य झाल्याची बाब सुनीलच्या लक्षात आली. अखेर शुक्रवारी सकाळी त्याने शिऊर पोलिस ठाणे गाठत आत्मसमर्पण करून स्वतःहून खुनाची कबुली दिली.सहायक पोलिस निरीक्षक वैभव रणखंब यांनी तत्काळ दौलताबाद पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला असता काही वेळातच मृतदेह घाटात मिळून आला. ओळख पटवून मृतदेह दिपाली आस्वार हिचा असल्याची खात्री पोलिसांकडून करण्यात आली.