भाविकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती
वैजापूर
गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या श्रीक्षेत्र गोदाधाम सराला बेटातील शनिदेवगाव येथे १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचा ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा निसर्गरम्य वातावरणात, हजारो भाविकांच्या उपस्थितीत, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महंत रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. ३० जुलै पासून सुरू होणाऱ्या या सप्ताहाची समाप्ती ६ ऑगस्ट रोजी होणार असून, याची नोंद गिनीज बुक ऑफ इंडियामध्येही झाली आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना महंत रामगिरी महाराज म्हणाले, “हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे गोदाधाम सराला बेटाचा महाकुंभ आहे. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी २०० वर्षांपूर्वी सुरू केलेली ही परंपरा आमच्यासाठी धर्मकार्य आहे. गुरूंच्या या परंपरेला पुढे नेण्याचा आमचा संकल्प आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, पूर्वी साधुसंत एकांतात तपश्चर्या करत असत, परंतु आज विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून हा सप्ताह अधिक दैदिप्यमान करायचा आहे. शनिदेवगाव, चेडुकळ, बाजाठाण, अव्वलगाव, हमरापुर, कमलपुर आणि भामाठाण या सात गावांच्या समन्वयाने हा सोहळा आयोजित होत आहे.
२०० वर्षांपूर्वी योगीराज गंगागिरी महाराजांनी या परंपरेची सुरुवात केली. १९८४ मध्ये ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजांनी या परिसरात सप्ताह आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेनुसार, शिवगिरी आश्रम, बाजाठाण येथे हा सप्ताह गेल्या १४ वर्षांपासून साजरा होत आहे. महंत रामगिरी महाराजांनी सांगितले की, हा परिसर सराला बेटाशी जोडलेला असून, येथील नियोजनामुळे हा सोहळा अधिक भव्य होईल.
Social Plugin