Coprative credit socitey froud - श्री साई बाबा महिला नागरी पतसंस्थेचा ठेवीदारांना पावणे सहा कोटींना गंडा

पतसंस्थेच्या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल


वैजापूर
ठेवीदारांची ५ कोटी ८३ लाख ६६ हजार ५७२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्री साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये पतसंस्थेच्या अध्यक्षा, उपाध्यक्षा, सचिव, मुख्याधिकारी, व्यवस्थापक व संचालकांचा समावेश आहे.


श्री साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सात शाखा आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगर शहरात चार, वैजापूर, लासुर स्टेशन व शिऊर येथे प्रत्येकी एक शाखा आहे. वैजापूर शहरात म्हसोबा चौकात पतसंस्थेची शाखा सुरू होती. ही शाखा साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी अचानक बंद झाली होती. त्यामुळे ठेवीदार हवालदिल झाले. त्यामुळे काही ठेवीदारांनी वैजापूर पोलीस गाठून आपली व्यथा मांडली होती. पोलिसांनी पैसे बुडालेल्या सर्व ठेवीदारांचे जबाब घेऊन माहिती पोलीस अधीक्षक यांना सादर केली होती.
या पतसंस्थेने शहरात तीन एजंटची नेमणूक केली होती. कृष्णा धुळे, सौरभ अटल व राहुल मतसागर यांनी शहरातील ग्राहकांकडून पैसे घेऊन ते पतसंस्थेत भरले होते. तसेच १६५ ठेवीदारांनी पतसंस्थेत मुदत ठेवी ठेवल्या होत्या. ही रक्कम ५ कोटी ८३ लाख ६६ हजार ५७२ इतकी होती. अचानक पतसंस्थेचे कार्यालय बंद पडल्याने सर्व ठेवीदारांची फसवणूक झाल्याचे समोर आले. याप्रकरणी पिग्मी एजंट कृष्णा दिलीपराव धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतसंस्थेच्या अध्यक्षा उषा गणेश मोरे, उपाध्यक्षा सुशीला राजेंद्र म्हस्के, सचिव गंगासागर शेजवळ, मुख्याधिकारी गणेश रामहरी मोरे, व्यवस्थापक रुस्तुम दादासाहेब मतसागर, संचालिका कविता विष्णू सुरडकर, सविता रामकिसन म्हस्के, सुजाता सतीश शेरखान, सविता गोकुळ मोरे, मंजुश्री दगडू काकडे, गिता चंद्रकांत चव्हाण, कल्पना नरसींग माळी, पूजा आदीनाथ नवले, पल्लवी किशोर आघाव, पार्वती गणेश रविवाले अशा एकूण १५ जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.