Inferior food products for children : अंगणवाडी पोषण आहारासाठी निकृष्ट साहित्य

वैजापूर तालुक्यातील एकोडीसागज येथील घटना : संबंधितावर कारवाईची मागणी

वैजापूर

तालुक्यातील एकोडीसागज येथील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी निकृष्ट दर्जाचे अन्न धान्य प्राप्त झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. शुक्रवारी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी हा सर्व 'शिधा' येथील पंचायत समिती कार्यालयात आणला. 


याबाबत अधिक महिती अशी की, वैजापूर तालुक्यातील एकोडीसागज येथील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी निकृष्ट दर्जाचे  अन्न धान्य पुरवठा करण्यात आला. दरम्यान या साहित्यात  निकृष्ट दर्जाच्या साहित्यासह काही मुदतबाह्य देखील वस्तू आढळून आल्या. ही सर्व बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी 'त्या' साहित्याने टेम्पो भरून वैजापूर पंचायत समितीत आणून उभा केला. 



दरम्यान पोषण आहारासाठी पुरविण्यात आलेले हे साहित्य वापरण्यातच आले नाही ? की निकृष्ट असल्याने उपयोगात आले नाही याबाबत सविस्तर खुलासा होऊ शकला नाही. या सर्व घटनाक्रमा दरम्यान ग्रामस्थांनी पंचायत समिती तील अधिकाऱ्यांसमोर हे साहित्य आणून ठेवले. या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 


तालुक्यातील नागरिकांचे लक्ष....

मुंबईत एका आमदाराने निकृष्ट जेवण दिल्याने जेवण बनविणाऱ्या आचाऱ्याला (कारागिराला) फ्री स्टाईल मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच  मात्र ग्रामीण भागातील चिमुकल्यांच्या पोषण आहाराच्या माध्यमातून जीवाशी सुरू असलेला या 'खेळा'बाबत प्रशासन काय कारवाई करते ? याकडे वैजापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.